तुम्ही आतापर्यंत चोरीच्या अनेक घटना ऐकल्या, वाचल्या असतील. पण, स्पेनमध्ये मात्र चोरीची एक विचित्र घटना घडली आहे. इथल्या पोलिसांनी चोरांना चोरीच्या मालासह रात्रीच्या सुमारास पडकलं, पण या मालात रोकड, मौल्यावन वस्तू यासारख्या वस्तू नसून चक्क हजारो किलो संत्री होती. त्यामुळे पोलिसांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

स्पेनमधल्या सव्हेल येथे गस्त घालणाऱ्या पोलिसांना चार संशयित गाड्या आढळल्या. पोलिसांना पाहताच या गाड्यांनी आपला मार्ग बदलला त्यामुळे पोलिसांना आणखी संशय आला. पोलिसांनी पाठलाग करून या गाड्या थांबवल्या. गाड्यांची तपासणी करण्यासाठी त्यांनी गाडीचं दार उघडलं. दार उघडल्याबरोबर संत्र्यांच्या मोठा ढिग खाली कोसळला अन् रस्त्यावर संत्र्यांची रास पसरली. या गाड्यांमधून हजारो किलो संत्री हे पाच चोर चोरून नेत होते. पुढे कित्येक तास खर्चून पोलिसांनी संत्री गोळा केल्या. या संत्र्याचं वजन चार हजार किलोंच्या घरात भरत होते.

पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण ही संत्री त्यांनी कुठून चोरली हे मात्र त्यातल्या एकानेही पोलिसांना सांगितलं नाही. आपण खूप दुरून आलो आहोत आणि याच प्रवासात आपण संत्री गोळा केली असल्याची थाप त्यांनी मारली. या थापांवर पोलिसच काय पण दुधखुळा बाळही विश्वास ठेवणार नाही हे नक्की! त्यामुळे पोलिसांनी याचा तपास केला. तेव्हा सव्हेलपासून काही दूर अंतरावर असलेल्या एका गोदामातून ही संत्री त्यांनी चोरली असल्याचं पोलिसांना तपासातून कळलं.