प्रत्येक शहरात, महानगरपालिकेकडून एक जागा निश्चित केली आहे, जिथे आपण कचरा टाकू शकतो. मात्र, काही ठिकाणे अशी असतात की जिथे जबरदस्तीने कचरा टाकून देतात. भुवनेश्वरमधील एका हॉटेलकडूनही असेच केले जात होते. हॉटेलमधील कचरा रस्त्याच्याकडेला टाकला जात होता, या कचऱ्यामुळे नागरिकांना घाणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या कचऱ्याबाबत अनेक तक्रारी लोकांनी महापालिकेकडे केल्या होत्या. या तक्रारीनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेल मालकाला चांगलाच धडा शिकवला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हॉटेलमधील कचरा रस्त्यावर टाकायचे –
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील कल्पना स्क्वेअरजवळील एका हॉटेलमधून रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत महापालिकेत सतत तक्रारी येत होत्या. त्यामुळे या हॉटेल मालकावर पालिकेच्या आयुक्तांनी अशी कारवाई केली आहे, जी त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील.
महापालिकेने केली मोठी कारवाई-
भुवनेश्वर महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त विजय अमृता कुलंगे यांच्या उपस्थितीत कचऱ्याने भरलेली ट्रॉली हॉटेलच्या एंट्री गेटवर खाली करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरात हॉटेलची बदनामी झाल्यानंतर हॉटेल मालकाने आपली चूक मान्य केली. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याबद्दक एक हॉटेलही बंद करण्यात आले आहे.
यासोबतच हॉटेल आणि व्यापाऱ्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य न केल्यास पुन्हा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, जनतेमध्ये स्वच्छतेचा ठोस संदेश देण्यासाठी हे करण्यात आले असून, जो कोणी हा नियम पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. महापालिकेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे अनेक लोक कौतुक करत असून हॉटेलचालकाला धडा शिकवल्याबद्दल आभार मानत आहेत. स्वच्छतेबाबत आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, जनतेचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.