BoycottOYO Trend: ओयो हा हॉस्पिटॅलिटी ब्रँड अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तरूणांमध्ये ओयोची लोकप्रियता मोठी आहे. ओयोवर अनेक मिम्सही तयार होत असतात. नुकतेच ओयोने आपल्या धोरणात बदल करत अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये खोली देणार नसल्याचा निर्णय घेतला होता. मेरठ येथे हा नियम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. कौटुंबिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा ओयोचा प्रयत्न आहे. मात्र सध्या ओयोकडून करण्यात आलेली एक जाहीरात वादात अडकली आहे. एका हिंदी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवर धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यासाठी सोशल मीडियावर #BoycottOYO असा ट्रेंड करण्यात येत आहे. या ट्रेंडद्वारे ओयोने माफी मागावी, अशी मागणी होत आहे.

ओयोचे प्रमुख रितेश अग्रवाल यांनी माफी मागावी, अशी मागणी हिंदुत्त्ववादी संघटना आणि विरोध करणाऱ्या लोकांनी केली आहे. एका हिंदी वर्तमानपत्रात ओयोने जाहिरात दिली होती. त्यात लिहिले होते, “देव प्रत्येक ठिकाणी आहे.. आणि ओयो ही” ओयोची ही टॅगलाईन देवाशी तुलना करणारी आहे, असा आरोप हिंदुत्ववाद्यांनी केला आहे. ओयोसारखे हॉटेल आणि देव यांची तुलना कशी काय होऊ शकते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सोशल मीडियावर #BoycottOYO ट्रेंड

ओयोच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर नाराजीची लाट पसरली आहे. हिंदू संघटनांनी ओयोने माफी मागावी, अशी मागणी होत असतानाच ओयोवर बहिष्कार टाकण्याची चळवळ सुरू केली आहे. यासाठी #BoycottOYO हा हॅशटॉग ट्रेंड केला जात आहे.

एका युजरने लिहिले, “ओयोने हिंदू धर्माच्या श्रद्धेवर हल्ला केला आहे. ते स्वतःची तुलना देवाशी कशी काय करू शकतात? तात्काळ माफी मागा आणि ही जाहिरात मागे घ्या. नाहीतर प्रत्येक शहारातील ओयो हॉटेलबाहेर आंदोलन करू.” इतर अनेकांनीही अशाच प्रकारची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोगोवरही हिंदुत्ववाद्यांची नाराजी

ओयोची जाहिरात आता निमित्त झाले आहे. लोकांनी ओयोच्या लोगोवरही नाराजी व्यक्त केली आहे. रितेश अग्रवाल यांनी मागे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, OYO चा लोगो भगवान जगन्नाथ यांच्यावर प्रेरित आहे. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार इंग्रजीमधील आद्याक्षर O हे जगन्नाथाचे डोळे आहेत. तर Y हे नाकासारखे आहे. अग्रवाल यांनी हे कारण दिल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. व्यवसायाच्या ब्रँडिंगसाठी धर्माचा आधार घेतल्याची टीका होत आहे. काही धार्मिक संघटनांनी मागणी केली की, ओयोने त्यांच्या लोगोत बदल करायला हवा.