Pilot Mistake in Flight: विमानात बसलेले प्रवासी निवांत प्रवास करत होते… पण अचानक घडलेल्या एका प्रकारामुळे सगळ्यांचा थरकाप उडाला. सुरक्षेच्या दृष्टीने अविश्वसनीय अशी ही चूक विमानाच्या कॅप्टनकडूनच घडली आणि मग सुरू झाला प्रवाशांचा हल्लकल्लोळ… काही मिनिटांतच असे काही घडले की, विमान कंपनीलाच तत्काळ पावले उचलावी लागली. हा धक्कादायक खुलासा आता जगभर चर्चेत आहे…प्रवासात असताना प्रवाशांना कल्पनाही केली नव्हती की, विमानाच्या कॅप्टनकडूनही अशी चूक होऊ शकते. पण जेव्हा सर्वांना हे लक्षात आलं, तेव्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं. एवढंच नाही, तर त्या क्षणानंतर एअरलाईन्सनं पायलटवर कडक कारवाई केली…
कल्पना करा… तुम्ही विमान प्रवास करताय, सीट बेल्ट लावून निवांतपणे सीटवर बसलेले आहात आणि अचानक तुम्हाला कळतं की, पायलटनं उड्डाणादरम्यान कॉकपिटचं दार उघडं ठेवलंय. थरकाप उडवणारी ही घटना नुकतीच घडलीय ब्रिटिश एअरवेजच्या एका फ्लाइटमध्ये.
काय घडलं नेमकं?
लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून न्यू यॉर्ककडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. नियमाविरुद्ध वागून कॅप्टननं मुद्दाम कॉकपिटचं दार उघडं ठेवलं. कारण? त्या पायलटच्या कुटुंबीयांचा प्रवास त्याच फ्लाइटमधून होत होता आणि त्यांना तो प्रत्यक्षात विमान कसं उडवतोय हे त्याला दाखवायचं होतं.
पण, हा उपद्व्याप केवळ भावनिक क्षण नव्हता, तर विमान प्रवासातील सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर मानला गेला. कारण- आंतरराष्ट्रीय नियमानुसार उड्डाण सुरू झाल्यानंतर कॉकपिटचं दार नेहमी बंद असणं आवश्यक आहे. हे दार बंद ठेवण्यामागे दहशतवाद आणि हायजॅकिंगसारख्या धोके टाळणे हा सुरक्षेचा महत्त्वाचा नियम आहे.
प्रवासी आणि क्रू घाबरले
कॉकपिटचे दार उघडे आहे ही बाब प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या लक्षात येताच एकंदर वातावरण एकदम बदलले. लोकांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट स्पष्ट दिसू लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, बराच वेळ कॉकपिटचे दार उघडेच राहिले होते. प्रवाशांना काहीच समजत नव्हतं, पायलट हे काय आणि का करीत आहे?
परिस्थिती इतकी गंभीर झाली की, फ्लाइट क्रूनं तातडीनं एअरलाइन्सला याची माहिती दिली. अखेर एअरलाइन्सनं लगेचच कारवाई करीत पायलटला निलंबित केलं.
पुढे काय झालं?
ब्रिटिश एअरवेजनं अधिकृत निवेदन देत स्पष्ट केलं, “सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष करणं मान्य केलं जाणार नाही.” एवढेच नव्हे, तर नागरिक उड्डाण प्राधिकरणाने (CAA) याबाबत चौकशीही सुरू केली आहे.
पायलट निलंबित झाल्याने परतीची न्यूयॉर्क ते लंडन फ्लाइट रद्द करावी लागली. त्यामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. एअरलाइन्सने त्यांना पर्यायी फ्लाइट्सची ऑफर दिली; मात्र लोकांच्या मनातला भीती काही कमी झाली नाही.
भावनिक क्षण अनुभवण्यासाठी पायलटने कुटुंबीयांना खूश करण्याचा प्रयत्न केला खरा… पण त्याचा परिणाम इतका मोठा झाला की, हजारो प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता या प्रकरणावर अंतिम निर्णय काय होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.