एकीकडे जगभरातून भारताच्या चांद्रयान मोहिमेचं कौतुक होत असताना ब्रिटिश माध्यमांमध्ये मात्र वेगळीच चर्चा चालू आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेचं तोंडदेखलं कौतुक करत असताना दुसरीकडे गरिबीचा सामना करणाऱ्या भारतानं इतका पैसा चांद्रयान मोहिमेवर खर्च करायला हवा का? असा प्रश्न ब्रिटिशि माध्यमे विचारत आहेत. यावर उद्योगपती आनंद महिंद्रांनी सविस्तर ट्वीट करून उत्तर दिल्यानंतर आता पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये एका ब्रिटिश न्यूज अँकरनं भारताला देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची रक्कम परत करण्याची मागणी केली आहे.
भारताचं चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्यानंतर त्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, दुसरीकडे बीबीसी वाहिनीवरील न्यूज अँकर “ज्या देशात करोडो लोकांना टॉयलेटही उपलब्ध नाही, अशा देशाने अंतराळ कार्यक्रमावर शेकडो कोटी रुपये खर्च करावेत का?” असा प्रश्न विचारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर उद्योगपती आनंद महिंद्रांनी सविस्तर पोस्ट करत “अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीने भारतातील गरिबी वाढवण्यास हातभारच लावला आहे”, असं सडेतोड उत्तर दिलं आहे.
“भारतानं ब्रिटनचे पैसे परत करावेत”
दरम्यान, बीबीसीनंतर आता जीबीएन नावाच्या वृत्तवाहिनीच्या न्यूज अँकरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित न्यूज अँकर भारताला ब्रिटननं हजारो कोटी दिले असून ते त्यांनी परत करावेत, असा दावा करताना दिसत आहे. “चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या यान उतरवल्याबद्दल मी भारताचं अभिनंदन करतो. पण मी भारताला असंही आवाहन करतो की २०१६ ते २०२१ या काळात ब्रिटिश सरकारने भारताला आर्थिक मदत म्हणून दिलेले २४ हजार कोटी रुपये भारताने परत करावेत. पुढच्या वर्षभरात ब्रिटन भारताला ५९७ कोटी रुपये देणार आहे. पण मला वाटतं, ब्रिटिश करदात्यांनी हा पैसा थांबवावा”, असं न्यूज अँकर पॅट्रिक ख्रिस्टिस म्हणताना दिसत आहे.
“भारतात जगातले सर्वाधिक गरीब राहतात”
“अंतराळ संशोधन कार्यक्रम असणाऱ्या देशांना आपण पैसा द्यायचा नाही असा नियम आपण करायला हवा. जर तुम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवू शकता, तर मग तुम्ही आमच्याकडे आर्थिक मदत मागायलाच नको. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार भारतात जगभरातले सर्वाधिक गरीब राहतात. भारत ही जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचा जीडीपी ३.७५ ट्रिलियन डॉलर्स आहे. जर भारत सरकारच त्यांच्या देशातील गरीब लोकांचा विचार करत नसेल, तर आपण तरी त्यांचा विचार करून त्यांना आर्थिक मदत का द्यायची?” असा प्रश्नही पॅट्रिक विचारताना दिसत आहे.
दरम्यान, पॅट्रिकच्या या व्हिडीओवर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. मनी कंट्रोलनं यासंदर्भात माहिती दिली आहे. “तू वर्णभेदी आहेस. तुम्ही भारताची ४५ ट्रिलियन डॉलर्सहून जास्त संपत्ती चोरून नेली. या देशाला गरीब केलं. तरीही भारतानं त्यावर मात केली आणि आता तुमच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकलं आहे”, असं एका यूजरनं म्हटलं आहे.
आर्थिक मदतीचा दावा खोटा?
दरम्यान, पॅट्रिक करत असलेला आर्थिक मदतीचा दावा खोटा असल्याचा दावा एका यूजरनं केला आहे. “२०१५पासून ब्रिटननं भारताला कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. आमचा बहुतेक निधी हा व्यवसाय वृद्धीसाठी गुंतवला जात आहे. यातून ब्रिटनमधील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ आणि रोजगार निर्माण होत आहेत”, असं या यूजरनं म्हटलं आहे.