VIDEO : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. दोन व्यक्ती एकत्र नव्या आयुष्याची सुरूवात करतात. या नव्या प्रवासात अनेक आव्हाने येतात. विशेषत: आई वडिलांचे घर सोडून जाणे एका मुलीसाठी खूप कठीण असते. लग्नात अनेकदा मुली आईवडिलांचा निरोप घेत सासरी जायला निघतात तेव्हा त्यांना अश्रु अनावर होत नाही. मुलीसह तिचं संपूर्ण कुंटूंब रडताना दिसतं. सोशल मीडियावर नवरी सासरी जातानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहिणीला निरोप देताना भाऊ रडताना दिसत आहे. हा भावनिक व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

बहिण भावाचे नाते हे जगावेगळे असते. ते कितीही भांडले तरीही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यांच्या नात्यात प्रेम, काळजी आणि जिव्हाळा दिसतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका बहिण भावाची जोडी दिसत आहे. बहिणीच्या लग्नाच्या दिवशी जेव्हा ती सासरी जायला निघते तेव्हा भावाला अश्रु अनावर होत नाही. तो बहिणीच्या गळ्यात पडून रडताना दिसतो. व्हिडीओत बहिण सुद्धा रडताना दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. काही लोकांना त्यांच्या बहिण भावाची आठवण येईल.

हेही वाचा : तरुणासमोर मुली पडतील फेल! सादर केली अप्रतिम लावणी; चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच, VIDEO होतोय व्हायरल

chaitanya_chorghe_cc या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ या नवरीच्या भावाने शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये भावनिक नोट शेअर केली आहे. तो कॅप्शनमध्ये लिहितो, “आजचं तुझं लग्न.. माहित नाही दिवस कसा निघून गेला पण शेवटी तुला जाताना बघून डोळ्यातून अश्रू कसे आले माहित नाही.. म्हटलं होतं लग्नात रडणार सुद्धा नाही, पण माहित नाही तू सोडून गेली याचं दुःख होतंय की तुझं आज लग्न आहे या गोष्टीचा आनंद होतोय.. असं म्हणतात की मुलीचे लग्न झाल्यावर फक्त तिचे आडनाव बदलते पण खरं तर मुलगी गेल्याने आई-वडील आपल्या जीवाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हाती सोपवतात.. आपण दोघं भाऊ बहीण.. तू मोठी जरी असली तरी तुला नावाने बोलायचो असं वाटायचं तू माझ्यापेक्षा लहानच आहे. … बस नेहमी खुश रहा. तुझी नेहमी आठवण येत राहील…. माझ्या झाल्या गेल्या चुका विसरून जा आणि मला माफ कर. मिस यू ताई” ही भावनिक पोस्ट पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नशीब लागतं बहिणीचं प्रेम भेटायला” तर एका युजरने लिहिलेय, “नशीबवान असतात ती मुलं ज्यांना बहिण असते.” आणखी एका युजरने लिहिलेय,”भाऊ आणि बहिणीचं नातं खूप वेगळं असते. . भाऊ तिला कधीच सांगत नाही की माझं माझ्या बहिणीवर किती प्रेम आहे तो असाच तिला कळू देत नाही. तिला हे कधी कळतं तेव्हा तिचं लग्न होतं कधीच डोळ्यात पाणी आलं नाही ते लग्नाच्या दिवशी कळतं भाऊ कसा असतो.”