Man Hanging from Bus Window: कधी कधी क्षणभरात घडलेली चूक आयुष्यभराची किंमत वसूल करून जाते. नेहमीसारखाच एक प्रवास सुरू होता, बस रस्त्यावर धावत होती; पण पुढच्या काही सेकंदांत घडलेली घटना पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. बसच्या खिडकीतून सुरू झालेला वाद इतका चिघळला की, काही क्षणांतच तो जीवघेणा ठरेल, याची कुणालाच कल्पना नव्हती. आत बसलेला प्रवासी आणि बाहेर उभा असलेला तरुण यांच्यातील धक्काबुक्की पाहणाऱ्यांना सुरुवातीला केवळ एक भांडण वाटलं; पण अचानक चालकाने घेतलेल्या निर्णयानं सगळं चित्रच बदललं. त्यानंतर काय घडलं? पुढे पाहिलं तर… काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ…
वाद थांबवायचं असेल, तर साधा उपाय म्हणजे भांडणाऱ्या दोघांना वेगळं करणं. पण, जर ही लढाई थेट बसच्या खिडकीवर सुरू झाली असेल तर? आणि त्यातही राग इतका अनावर झाला की, थांबायचं नावच नाही… अशा प्रसंगी पोलिसांना बोलावलं असतं, तर बरं झालं असतं. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये बस ड्रायव्हरने क्षणाचाही विचार न करता, असा काही निर्णय घेतला की, ज्यामुळे पुढे जी दुर्घटना घडली, ती पाहून अंगावर काटा आला.
हा थरारक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. बसच्या खिडकीतून आतला प्रवासी (ज्याला काहींनी कंडक्टर म्हटले आहे) बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीशी वाद घालतो. बोलाचाली एवढी वाढते की, बाहेरचा माणूस संतापून बसच्या खिडकीवर चढतो आणि त्या प्रवाशाला मारहाण करू लागतो. चकमक वाढत जात असतानाच अचानक बस ड्रायव्हर बस पुढे घेऊन जातो.
त्यामुळे आतला प्रवासी सुरक्षित राहतो; पण बाहेर लटकलेला माणूस मात्र खिडकीलाच अडकून राहतो. बसचा वेग वाढताच तो माणूस काही काळ खिडकीला लटकून राहतो आणि काही सेकंदांत व्हिडीओ संपतो. हे फुटेज केवळ २९ सेकंदांचे असले तरी त्यामध्ये जे घडलं, ते थरकाप उडवणारं होतं.
माध्यमांच्या रिपोर्टनुसार, खिडकीवर लटकलेली ती व्यक्ती पुढे जाऊन बसच्या चाकाखाली आली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बसचालकाने थेट पोलीस ठाण्यात हजेरी लावून शरणागती पत्करली.
हा व्हिडीओ Instagram वर @absolute_laughs या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं – “प्रत्येक ठिकाणी हीरो बनायची गरज नसते.” आतापर्यंत या व्हिडीओला साडेतीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज, ११ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ३०० हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
विशेष म्हणजे अनेकांना या घटनेचा संपूर्ण शेवट माहीत नसल्याने काहींनी हसऱ्या इमोजी टाकत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. पण ज्यांना खरी माहिती आहे त्यांनी मात्र कमेंटमध्ये सत्य उघड केलं “हा त्या व्यक्तीचा शेवटचा क्षण होता… पुढे तो बसखाली येऊन जागीच मेला.”
येथे पाहा व्हिडीओ
या थरारक व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ निर्माण झाली असून, ड्रायव्हरच्या क्षणिक निर्णयामुळे एका जीवावर बेतलेली ही घटना सध्या चर्चेत आहे.