गुजरातमधील नर्मदा परिसरामध्ये एका पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कारवरील ताबा सुटल्याने कार थेट दुभाजकाला धडकून काही फूट हवेत उडाल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामधील एक कुटुंब येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पाहण्यासाठी जात होते. नर्मदाच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली ही कार एका पेट्रोल पंपाजवळून जाताना हा अपघात घडला. पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या वळणावर पलिकडच्या लेनमधून एक गाडी यु-टर्न घेत होती. त्याचवेळी समोरुन आलेल्या या गाडीच्या चलकाने यु-टर्न घेऊन बाहेर आलेल्या गाडीला धडक होऊ नये म्हणून गाडी वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. दुभाजकाला धडकून ही गाडी काही फूट हवेत उडाली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अपघात इतका भीषण होता की गाडी हवेतच पूर्णपणे उलटल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

या अपघातामध्ये गाडीतील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका दहा वर्षाच्या मुलाचा समावेस आहहे. या सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.