LinkedIn Post Of CEO About Career Advice From Parents: एका सीईओने लिंक्डइनवर मुलांनी करिअरबाबत पालकांचा सल्ला ऐकावा की नाही, याबाबत एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठा प्रमाणात व्हायरल होत असून, यावर असंख्य प्रतिक्रिया येत आहेत. पोस्टमध्ये, सीईओने यावर भर दिला आहे की, पालकांचा हेतू नेहमीच चांगला असतो, परंतु त्यांना आधुनिक करिअरच्या संधींबद्दल नेहमीच माहिती असते असे नाही. पोस्टमध्ये सुचवण्यात आले आहे की, त्यांचा सल्ला त्यांच्या मुलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि समाधानी राहावे या इच्छेतून येतो, सध्या काय सुरू आहे याच्या आकलनातून नाही.
या सीईओने पोस्टमध्ये तरुणांनी पालकांच्या सल्ल्यांचे आंधानुकरण करण्याऐवजी स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा असे म्हटले आहे. सीईओच्या मते, कुटुंबातील सदस्य त्यांच्या काळात सुरक्षित किंवा प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या गोष्टींवर आधारित अनेकदा मते तयार करतात. पण, आज नोकरीचे क्षेत्र खूप विस्तारले आहे, नवीन क्षेत्रे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अपारंपरिक भूमिका प्रासंगिक होत आहेत. पोस्टमध्ये असे सूचित केले आहे की, जर मुले स्वतंत्रपणे स्थिरता आणि आनंद निर्माण करू शकत असतील तर त्यांचे कुटुंब अखेर त्यांच्या निवडी स्वीकारतात.
या सीईओने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अलोकप्रिय मत मांडतो. करिअरचा निर्णय घेताना पालकांचे सल्ले ऐकू नयेत. त्यांना सर्वोत्तम करिअर पर्यायांबद्दल माहिती नसते. याचबरोबर त्यांच्या मित्रांचेही ऐकू नका, ज्यांच्या आधारे ते त्यांची मते मांडतात.”
दरम्यान ही पोस्ट अनेक लिंक्डइन युजर्सना भावली. यावर त्यापैकी अनेकांनी वैयक्तिक अनुभव शेअर केले. काहींनी पालक आणि त्यांच्या सामाजिक परिस्थितीने एकेकाळी त्यांच्या करिअरचे निर्णय कसे लादले होते, याबद्दल सांगितले.
एकाने कमेंट केली आणि म्हटले की, “वा! मला याची खूप गरज होती. मला आठवते की, माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी मी कशात करिअर करायचे हे ठरवले होते, मी अजूनही माझ्या याच्याशी जुळवून घेण्यास संघर्ष करत आहे.”
यावर इतर काही युजर्सनी अधिक संतुलित दृष्टिकोन मांडला आणि म्हटले की, पालकांना नेहमीच नव्या संधींबद्दल माहिती नसते, परंतु ते लवचिकता, नैतिकता आणि दीर्घकालीन सुरक्षिततेबद्दल अमूल्य मार्गदर्शन देतात. तर काहींनी असे म्हटले की, सर्वोत्तम दृष्टिकोन म्हणजे पालकांच्या मतांचा आदर करणे परंतु वैयक्तिक ध्येयांवर आधारित स्वतंत्रपणे निर्णय घेणे.