Kasara Kalyan Local Train Passengers Fight For Seats Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यात मध्य रेल्वेच्या लाइनवरून सकाळी कार्यालयीन वेळात सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढणं जिकीरीचं होत आहे. तरीही प्रवासी जीव मुठीत घेऊन गर्दीत कसे बसे ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपड करतात. यात ट्रेनमध्ये चढल्यानंतर अनेकदा प्रवाशांना ग्रुपबाजीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे सीट्स असतानाही प्रवाशांना बसण्यास विरोध केला जातो. काही प्रवासी ट्रेनच्या ग्रुपमधील उपस्थित नसलेल्या प्रवाशासाठी सीट राखून ठेवताना दिसतात, ज्यावरून अनेकदा भांडण, मारहाणीच्या घटना घडतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो कसारा ते कल्याण लोकलदरम्यानचा आहे. ज्यात एक प्रवासी ग्रुपमधील इतर प्रवाशासाठी सीट राखून ठेवत दादागिरी करताना दिसला.

मंगळवारी पहाटे ६ वाजून १० मिनिटांनी कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हा दादागिरीचा प्रकार समोर आला. सीएसएमटीच्या दिशेने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या एका ग्रुपने उपस्थित नसलेल्या त्यांच्या प्रवासी मित्रासाठी बॅग ठेवून सीट्स अडवून ठेवल्या, यावेळी बॅग उचला मला बसू द्या म्हणताच, त्या ग्रुपमधील प्रवाशांनी दादागिरीची भाषा सुरू केली. वारंवार सांगूनही त्यांनी बॅग उचलली नाही, अखेर संतप्त प्रवाशाने व्हिडीओ शूट करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला, जो पाहून प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

“आमचा माणूस येणार आहे, दोन्ही सीट्स आमच्या”

व्हिडीओत पाहू शकता की, एक प्रवासी खिडकीजवळच्या सीटवर आरामात मोबाईलवर टाईमपास करत बसला आहे. शेजारच्या दोन सीट्सवर त्याने आपली बॅग ठेवत इतर प्रवाशांना तो बसण्यापासून रोखतोय. आमचा माणूस येणार आहे, दोन्ही सीट्स आमच्या आहेत, कोणी बसू नयेत, आम्ही रोज असंच करतो, तुम्हाला जे करायचं आहे करा, अशी अरेरावीची भाषा तो करतोय. यामुळे सीट्स असूनही इतर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतोय. प्रवासी ग्रुपची ही दादागिरीची भाषा ऐकून संतप्त झालेल्या एका प्रवाश्याने व्हिडीओ शूट करत त्यांना जाब विचारला, पण कोणीही त्यावर बोलण्यास तयार झालं नाही. पण, लोकल ट्रेनमधील हे चित्र काही नवीन नाही, अनेकदा आधीच्या स्टेशनवर चढलेल्या प्रवाश्याला काही माजलेल्या प्रवाशांच्या ग्रुपबाजीमुळे सीट्स असून बसायला मिळत नाही, ज्यामुळे तासभर त्यांना उभं राहून प्रवास करावा लागतो.

प्रवासी ग्रुपची सीट्ससाठी इतर प्रवाशांबरोबर दादागिरी

अनेकदा या सीट्सवर वाद, मारहाणीच्या घटना घडतात. पण, रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसते. त्यामुळे तिकीट असूनही अशा ग्रुपबाजीचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय. अनेकदा हे ग्रुप सीट्ससाठी काही प्रवाशांबरोबर थेट दादागिरीची भाषा करतात, प्रवाशांवर हात उचलतात; अशावेळी त्या एकट्या प्रवाश्याच्या मदतीसाठी स्टेशनवर एकही रेल्वे पोलिस कर्मचारी उभा नसतो. पण, तिकीट चेक करण्यासाठी शेकडो टीसी प्रत्येक स्थानकावर असतात.

त्यामुळे अशा घटना रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेत कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांकडूनह संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ट्रेनमधील ही ग्रुपबाजी आजची नाही तर रोजची आहे असे म्हटले आहे; तर काहींनी रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर बोट ठेवलं आहे.