पोलिस, फायर ब्रिगेड, हॉस्पिटल्सचे इमर्जन्सी नंबर हे तुम्हाला अडचणीच्या मदतीसाठी दिलेले असतात. कुठे आग लागली, अपघात झाला, तर या नंबर्सच्या माध्यमातून मदत मिळवता येते. मात्र, एका मुलाने पोलिस कर्मचाऱ्याला मिठी मारायची म्हणून पोलिसच्या १०० या इमर्जन्सी नंबरवर कॉल केला. इमर्जन्सी नंबरवर कॉल आल्याने पोलिसही त्या मुलाच्या घरी पोहोचले तेव्हा मुलाने सांगितले की, त्याने फक्त मिठी मारण्यासाठी फोन केला होता. त्यावर पोलिसांनी असे काही उत्तर दिले; जे वाचून तुम्हीही थक्क व्हाल .
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मुलाने पोलिसांच्या १०० या इमर्जन्सी नंबरवर कॉल केल्याने पोलिस अधिकारी त्याच्या घरी पोहोचतात. पोलिस घरी पोहोचताच तो मुलगा त्यांना म्हणतो की, मला तुम्हाला मिठी मारायची होती म्हणून मी इमर्जन्सी नंबरवर कॉल केला. मुलाचे बोलणे ऐकून पोलिस कर्मचारीही चकित झाले आणि निघताना त्यांनी मुलाला चांगलीच समज दिली.
व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, पोलिस एका घराचा दरवाजा ठोठावल्यावर एक महिला बाहेर आली. पोलिस कर्मचाऱ्याने त्या महिलेला विचारले की, तिने फोन केला होता का? त्यावर त्या महिलेने नाही, असे उत्तर दिले आणि मुलाला बोलावले. मुलाने सांगितले की, मी फोन केला होता. कारण- विचारले असता त्याने सांगितले की, मला एका पोलिसाला मिठी मारायची होती म्हणून मी फोन केला होता.
हे ऐकून पोलिस कर्मचाऱ्याने मुलाला बोलावून मिठी मारली; पण हा नंबर आवश्यक असेल तेव्हाच वापरावा, असे त्याने सांगितले. पोलिस कर्मचार्याने सांगितले की, जर तुम्हाला गरज असेल किंवा तुमच्या आईला काही मदत हवी असेल किंवा अशी कोणतीही घटना घडत असेल; ज्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला असेल, तर तुम्ही या नंबरवर कॉल करा. पोलिसाने आनंदाने मुलाला समजून घेतले आणि तेथून निघून गेले. ही संपूर्ण घटना पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर लावलेल्या बॉडी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एका फेसबुक युजरने लिहिले, “सर, या मुलाशी बोलताना संयम बाळगल्याबद्दल आणि आवश्यक गोष्टी त्याला समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.” दुसर्याने लिहिले, “मुलावर इतकी दया दाखवल्याबद्दल हा पोलिस सलामीला पात्र आहे.” आणखी एकाने लिहिले, “मुलांना महत्त्वाची गोष्ट समजावून सांगितली म्हणून त्या पोलिस कर्मचार्याने आम्ही आभार मानतो.” अशाच स्वरूपाच्या अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओखाली आल्या आहेत.