आजकाल अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राणी, पक्षी पाळतात. प्राणी, पक्षी यांना घरी आणल्यानंतर ते आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतात. एखाद्या प्राणी किंवा पक्षाचे पालकत्व स्वीकारल्यानंतर त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाताना त्यांच्यामागे खूप कसरत करावी लागते. त्यांना योग्य ते अन्न देणे, स्वच्छता राखणे, त्यांची योग्य ती काळजी; तर वाहनांमधून प्राण्यांना कसं घेऊन जायचं हासुद्धा प्रश्न असतो. तर आज सोशल मीडियावर अशीच एक मजेशीर घटना व्हायरल होत आहे. एका आजी आणि तिच्या नातीला पोपटांना बसमधून नेणं महागात पडलं आहे.

मजेशीर घटना तिकिटावरील तारखेनुसार मंगळवारी सकाळी घडली आहे. एक महिला आणि तिची नात बंगळुरूहून म्हैसूरला जाण्यासाठी बसमध्ये चढली. कर्नाटक सरकारच्या ‘शक्ती योजने’अंतर्गत मोफत बस प्रवासासाठी पात्र असल्याने त्यांना तिकीट खरेदी करण्याची गरज नव्हती. पण, जेव्हा बस कंडक्टरने महिला आणि तिच्या नातीबरोबर पिंजऱ्यात असणाऱ्या चार पोपटांना पाहिलं तेव्हा मात्र त्यांनी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आणि इतर प्रवाशांचाही गोंधळ उडाला. कारण कंडक्टरने प्रत्येक पोपटाचे १११ रुपये म्हणजेच चार पोपटांचे ४४४ रुपयांचे महिला प्रवाशाला तिकीट काढावे लागले. हे मजेशीर प्रकरण बसमध्ये उपस्थित एका प्रवाशाने त्याच्या कॅमेरामध्ये कैद केलं आणि सोशल मीडियावर @TeluguScribe या अकाउंटवरून शेअर केले. पाहा ही मजेशीर पोस्ट.

हेही वाचा…जबरदस्त! स्वाक्षरीने चित्र रेखाटणारा ‘अनोखा’ कलाकार; VIDEO पाहून कराल सलाम

पोस्ट नक्की बघा…

असे दिसून आले की, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ शहर, उपनगर आणि ग्रामीण मार्गांसह नॉन-एसी बसेसमध्ये पाळीव प्राण्यांबरोबर प्रवास करण्याची परवानगी देतात. पाळीव श्वान, ससा, पक्षी आणि मांजरसाठी प्रवाशांकडून तिकिटाचे शुल्क आकारले जाते.पण, कर्नाटक वैभव, राजहंस, नॉन-एसी स्लीपर या प्रीमियम सेवांवर ही सवलत देत नाहीत.

अशाप्रकारे पोपटांना एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देण्यात आली आहे. तसेच याव्यतिरिक्त कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) अधिकाऱ्यांनी असा इशाराही दिला आहे की, जे प्रवासी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी तिकीट काढत नाहीत, त्यांना प्रवासाच्या तिकीट किमतीच्या १० टक्के दंड आकारला जातो. तसेच जर कंडक्टर पाळीव प्राण्यांसाठी अर्ध (Half) तिकिटे देत नसतील, तर त्यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो आणि KSRTC निधीच्या गैरवापरासाठी त्यांना निलंबितसुद्धा केले जाऊ शकते. त्यामुळे कंडक्टरने महिलेला या चार पोपटांचे तिकीट काढण्यास सांगितले.