शाळेचा पहिला दिवस प्रत्येक लहान मुलांसाठी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो पण जवळपास प्रत्येक लहान मुलं या दिवशी घाबरते. आई-बाबांशिवाय अनोळखी ठिकाणी, अनोळख्या लोकांबरोबर काही तास राहायचे म्हणजे मुलांसाठी अत्यंत अवघड गोष्ट असते. काही मुलं शाळेत जाण्याच्या भीतीनेच रडू लागतात तर काही शाळेत पाय ठेवताच रडू लागतात. काही जण रडत रडत वर्गात जाऊन बसतात. आई-बाबांकडे जाण्याचा हट्ट करता. कोणी म्हणत आई-बाबांशी फोनवर बोलायचे आहे. शाळेचा पहिला दिवस नव्हे तर पुढचे काही दिवस मुलं असाच गोंधळ घालतात. हळू हळू त्यांचे शाळेत मन रमू लागते, इतर विद्यार्थ्यांबरोबर गट्टी होते, शिक्षक ओळखीचे आणि आपले वाटू लागतात त्यानंतर मुलांना शाळाही आपली वाटू लागते. पण हे सर्व होईपर्यंत शिक्षकांना मात्र मुलांना प्रेमाने समजावावे लागते, त्यांचे छोटे छोटे हट्ट अन् विनंत्या पूर्ण कराव्या लागतात. नव्याने शाळेत जाणाऱ्या मुलांचे असेच काही मजेशीर व्हिडिओ आज काल सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे पाहून आपल्या चेहऱ्यावरही हसू येते. कोणाला आपले शाळेचे दिवस आठवतात तर कोणाला आपल्या मुलांचे शाळेचा पहिला दिवस आठवतो. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या बोबड्या बोलीत मम्मी पप्पांना फोन लावून देण्याची विनंती शिक्षकांना करते आहे जे पाहून नेटकरी पोट धरून हसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली शिक्षकांजवळ जाते आणि आपल्या बोबड्या बोलीत मोबाईल नंबर सांगू लागते. “९६…..९१९०७०” असे काहीसे मराठी अंक तो आपल्या बोबड्या बोलीत शिक्षकांना दोनदा सांगते पण शिक्षकांना काही समजत नाही. त्यानंतर तो दुसऱ्या शिक्षिकेला आवाज देऊन सांगते, माझ्या मम्मी पप्पाला फोन लावून द्या म्हणत हट्ट करते अन् तोच मोबाईल नंबर सांगते. त्या शिक्षिकेलाही ती काय बोलत आहे हे समजत नाही त्यामुळे त्या त्याला पुन्हा नंबर विचारतात. चिमुकली बोबड्या बोलीत पुन्हा तोच नंबर हळू हळू सांगते. पण चिमुकली ज्या पद्धतीने बोबड्या बोलीत नंबर सांगत आहे ते पाहून नेटकऱ्यांना मात्र हसू आवरत नाही. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
इंस्टाग्रामवर manglavaidhy नावाच्या पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शाब्बास बाळा! तू मराठी अंक बोलले.”
व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी चिमुकलीचे कौतुक केले. एकाने लिहिले, “सलाम त्या आई-बाबांना ज्यांच्या त्यांच्या बाळाला मराठी अंक अति उत्तमपणे शिकवले आहेत.”
दुसऱ्याने लिहिले की,”किती वेळा ऐकलं असेल मी तरी पण एवढंच समजलं…९६…..९१९०७० शहाणं बाळ ते.”
तिसऱ्याने लिहिले, “काय म्हणते समजलं नाही पण खूप गोड मुलगी आहे.”
चौथ्याने लिहिले की,” मराठी भाषेचा अभिमान आहे त्या लहान मुलाला आणि आपण”
पाचव्याने लिहिले की, “तिच्या गोड आवाजामुळे मी दहा वेळेस व्हिडिओ पाहिला पण, नंबर काय मला कळलं नाही.”