Dalai Lama Kissing Boy Viral Video: बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांनी एका मुलाच्या ओठांचे चुंबन घेत असल्याचा आणि नंतर मुलाला “माझ्या जिभेला जिभेने स्पर्श कर,” असे सांगितले होते. या भेटीचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. या फुटेजमध्ये दलाई लामा यांनी आपली जीभ पुढे करून मुलाला स्पर्श करण्यास सांगत होते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत हे कृत्य ‘भीतीदायक’, ‘घृणास्पद’ आणि ‘निंदनीय’ असल्याचे अनेकांनी म्हटले होते.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा प्रकार घडत असताना इतर लोक जे टाळ्या वाजवत, हसत होते हे अत्यंत घृणास्पद आहे. असे काहींनी म्हटले होते. या घटनेवर दलाई लामा यांच्याकडून अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.

“एका लहान मुलाने परमपूज्य दलाई लामा यांना मी तुम्हाला मिठी मारू का, असे विचारले होते. यानंतर दलाई लामा यांनी त्यांच्या कृतीने किंवा शब्दांनी झालेल्या नुकसानासाठी संबंधित मुलाची, त्याच्या कुटुंबाची तसेच त्याच्या मित्रांची माफी मागितली आहे. परमपूज्य अनेकदा निष्पाप आणि खेळकरपणे भेटलेल्या लोकांशी संवाद साधतात, अगदी सार्वजनिक आणि कॅमेरासमोरही. मात्र त्यांना या घटनेबद्दल खेद वाटतो,” असे दलाई लामा यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, सदर व्हायरल व्हिडीओनंतर काही अनुयायांनी दलाई लामा यांच्या कृतीचे समर्थन केले होते. तसेच बीबीसीच्या एका लेखाचा हवाला देत म्हटले आहे की, तिबेटमध्ये जीभ बाहेर काढून दाखवणे ही एक प्रथा आहे. ही परंपरा नवव्या शतकाची आहे, लांग डार्मा नावाच्या कुप्रसिद्ध राजाच्या कारकिर्दीत, ज्याला त्याच्या काळ्या जिभेसाठी ओळखले जाते. ते त्याचा पुनर्जन्म नाहीत हे दाखवण्यासाठी तिबेटमधील लोक त्यांच्या जिभा बाहेर काढतात, असे एका वापरकर्त्याने लिहिले.