dashcam video of private bus drivers reckless driving goes viral : देशात महामार्गावर अपघात होणे नवीन नाही, दररोज कुठेतरी असा अपघात झाल्याचे ऐकायला मिळते. नुकतेच आंध्र प्रदेशात असाच एक भीषण अपघात घडला असून यामध्ये २० जणांना जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वापरकर्ता @Chandra4bharat यांनी एक डॅशकॅम व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांच्यासमोर चालणाऱ्या एका खासगी बसने अचानक टर्न घेतल्यामुळे, त्यांच्या कारची एका ट्रकला धडक बसणे थोडक्यात हुकले. चंद्र हे बंगळूरू-हैदराबाद महामार्गावरून प्रवास करत होतो आणि ही थरारक घटना पहाटे ४:३० च्या सुमारास घडली.

त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहीले की, “काल पहाटे ४:३० वाजता हैदराबाद-बंगळुरू रोडवर खाजगी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे माझा अपघात होता होता वाचला! सुदैवाने, मी घाबरलो नाही. एक चुकीचे वळण आमच्या जीवावर बेतले असते!! खासगी ट्रॅव्हल्स बस आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे अनेक लोक आपला जीव गमावतात, त्याचे हे फक्त एक उदाहरण आहे!”

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून याला १.२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांनी चंद्र यांच्या वाहन चालवण्यावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे खी चंद्र यांनी देखील बसच्या मागे वाहन चालवायला नको होते. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, “होय, मी बसच्या मागे लागूनच गाडी चालवत होतो, ही माझी चूक होती. परंतु, जेव्हा बस चालकाला एक हळू वेगाने जात असलेला ट्रक दिसला, तेव्हा त्याने अचानक वळण घेण्याऐवजी गाडीचा वेग कमी करायला हवा होता. मला वाचवण्यासाठी नाही, तर ते त्याने स्वतःच्या बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करायला हवे होते.” काही जणांनी चंद्र यांची बाजू घेतली आहे तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.

अनेक वापरकर्त्यानी रस्त्यांवर वाहन चालवण्यात आणि प्रवास करण्यात असलेले धोके अधोरेखित केले आहेत. “बस, ट्रेन किंवा विमान कशानेही प्रवास केला तरी जीवाची शाश्वती नसते. परंतु गेल्या ३-४ वर्षांत मला वैयक्तिकरित्या बसच्या तुलनेत ट्रेनचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित वाटतो आहे. आजकाल बहुतेक बस चालक अतिशय बेदरकारपणे गाडी चालवतात आणि अनेक ऑपरेटर्स अजूनही संपूर्ण प्रवासासाठी फक्त एकाच ड्रायव्हरवरती काम चालवत आहेत. खरंतर प्रत्येक आंतरराज्यीय किंवा लांब पल्ल्याच्या बसमध्ये अंतराचा विचार न करता, किमान दोन चालक आणि एक वाहक असणे गरजेचे आहे,” असे मत एका वापरकर्त्याने व्यक्त केले आहे.

२० जणांचा जीव गेला

काही दिवसांपूर्वीच मोठी दुर्घटना घडलेली असताना हा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी पहाटे एक खासगी बस हैदराबादहून बंगळुरू येथे जात होते. आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जवळ या बसला आग लागली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीने धडक दिल्यानंतर बसच्या इंथनाच्या टाकीचा भडका उडाला आणि संपूर्ण वाहनाला आग लागली. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला.