रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच २००० च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर लोकांनी आपल्याकडे ठेवलेल्या २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर बहुतांश लोक विशेषत: दुकानदार २००० च्या नोटा घेण्यास नकार देत आहे. यामुळे तुमच्याकडेही २००० नोटा असतील आणि तुम्हाला त्या बदलण्याची काळजी वाटत असेल आणि तुम्हाला बँकेत रांगेत उभे राहण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही तु्म्हाला अशा एका रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहोत, जिथे २००० च्या नोटांसाठी एक खास स्कीम सुरू केली आहे. या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही २००० ची नोट दिल्यानंतर तुम्हाला ३००० रुपयांचे जेवण खाता येणार आहे.
अडोर २.१ रेस्टॉरंटची स्कीम काय आहे?
नवी दिल्लीतील प्रसिद्ध कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या अडोर २.१ नावाच्या रेस्टॉरंटने ‘अब दुविधा में भी सुविधा है’ नावाची एक स्कीम सुरू केली आहे. या स्कीममुळे तुम्हाला २००० ची नोट बदलण्यासाठी बँकेत रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त या रेस्टॉरंटमध्ये यायचे आहे, २००० रुपयांची नोट देऊन, त्याऐवजी ३००० रुपयांपर्यंतचे खाद्यपदार्थ मागवायचे आहेत. म्हणजेच तुमची २००० रुपयांची नोटही वापरली जाईल आणि तुम्हाला १००० रुपयांचे खाद्यपदार्थ फ्रीमध्येही मिळतील. ही स्कीम ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. पण ज्यांना २००० च्या नोटा बदलून पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी ही स्कीम काहीच कामाची नाही.




एवढेच नाही तर या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही २००० रुपयांच्या ५ नोटा म्हणजेच १० हजार रुपयांच्या नोटा आणल्यास तुम्हाला प्रीव्हिलेज मेंबरशिप कार्ड दिले जाईल. या कार्डद्वारे तुम्ही एका वर्षात २०००० रुपयांची ऑर्डर करू शकता. म्हणजे ५० टक्के नफा मिळवू शकता. याशिवाय ही ऑफर केवळ १००० कार्डपुरतीच मर्यादित आहे.