सध्याच्या काळात कोणताही परिणामकारक संदेश पाठवण्यासाठी अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. आपल्या देशातील पोलीस विभाग सोशल मीडियाचा अगदी उत्तम प्रकारे वापर करुन लोकांपर्यंत योग्य तो सल्ला पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये कधी ते नागरिकांना दारु पिण्याचे दुष्परिणाम तर कधी वाहतुकीचे नियम न पाळण्याचे दुष्परिणाम सांगत असतात.
मुंबई पोलिसांची सोशल मीडिया टीम हे काम उत्कृष्टरित्या करत असल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. अशातच आता दिल्ली पोलिसांनी केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, आयपीएलशी संबंधित एक फोटो शेअर करत महत्त्वपूर्ण वाहतूक सल्ला दिला आहे. आपल्यापैकी अनेकजण आयपीएल मॅच आवडीने बघत असतात. शिवाय मॅचशी संबंधित अनेक ट्रेंडदेखील आपणला पटकन समजतात. त्यामुळे पोलिसांनी देखील लोकांना आवडेल अशाच पद्धतीने वाहतुकीचे नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
दिल्ली पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये काल झालेल्या पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यामध्ये अर्शदीप सिंगने तोडलेल्या स्टंपचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “मला तोडा पण ट्रॅफिक सिंग्नला नाही” शिवाय त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. “ट्रॅफिक सिग्नल तोडले तर तुम्ही फक्त चालान जिंकू शकता! #IPL2023,” पोलिसांनी शेअर केलेल्या या पोस्टचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टला आतापर्यंत २ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.