अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनची गणना लग्जरी प्रोडक्टमध्ये होते. याच अ‍ॅपल कंपनीचे लाखो रुपयांचे नवीन iPhone चक्क एका डिलिव्हरी बॉयने चोरल्याचे समोर आले आहे. हा डिलिव्हरी बॉय तब्बल 18 लाख रुपयांचे ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’ घेऊन फरार झाला. जाणून घेऊया काय आहे ही घटना :-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफोनच्या चोरीची ही घटना चीनमधील आहे. चीनमध्ये iPhone 12 Pro Max चे 14 युनिट घेऊन एक डिलिव्हरी बॉय फरार झाला. या फोन्सची किंमत जवळपास 18 लाख रुपये होती. पण चोरी झाल्याच्या थोड्या दिवसांमध्येच पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्यात. टँग असं या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.

Meituan-Dianping नावाच्या कंपनीने टँगकडे 14 ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’ डिलिव्हरी करण्यासाठी दिले होते. ही ऑर्डर 14 नोव्हेंबर रोजी प्लेस करण्यात आली होती. ऑर्डर मिळाल्यानंतर डिलिव्हरी बॉय टँगने सर्व 14 ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’ची ऑर्डर कँन्सल केली, पण त्याने फोन रिटर्न केले नाहीत.
माध्यमांतील वृत्तानुसार, टँगने ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’चा एक बॉक्स ओपनही केला, तर दुसरा फोन कर्ज फेडण्यासाठी आपल्या मित्राला दिला. याशिवाय तिसरा फोन त्याने एका दुकानात 9,500 चिनी युआन म्हणजे जवळपास 1,07,222 रुपये आणि चौथा फोन केवळ 7,000 चिनी युआन म्हणजे जवळपास 79,032 रुपयांमध्ये विकला.

काही आयफोन विकल्यानंतर टँगने एक BMW कार भाड्यावर घेतली आणि तो फिरायला निघाला. कारच्या भाड्यासाठी त्याने दररोज 600 चिनी युआन म्हणजे साधारण 6,772 रुपये मोजले. त्याने आपल्यासाठी काही महागडे कपडेही खरेदी केले. म्हणजे दोन-चार दिवस तो लॉटरी लागल्याप्रमाणे ऐश करत होता. पण थोड्याच दिवसांत पोलिसांनी त्याला उर्वरीत ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’च्या युनिट्ससोबत अटक केली. शिवाय त्याने विकलेले चार फोनही हस्तगत केले.

दरम्यान, घटनेनंतर अ‍ॅपल स्टोअरने टँगला बॅन केले असून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं आहे. शिवाय त्याच्याविरोधात लवकरच कायदेशीर कारवाईही होणार आहे. यापूर्वीही एका चिनी व्यक्तीला हाँगकाँगमधून काही iPhone X चोरी केल्यामुळे अटक झाली होती. दोन देशांतील किंमतीत असलेल्या फरकामुळे त्याने चोरी केल्याचं समोर आलं होतं. तर, स्पेनमध्येही अशीच एक घटना घडली होती. स्पेनमध्ये पाच अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना जवळपास 3.71 कोटी रुपयांचे आयफोन चोरी करण्याच्या प्रयत्नात अटक झाली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delivery guy runs away with iphone 12 pro max units in china sas
First published on: 20-11-2020 at 14:00 IST