Desi Jugaad Viral Video : तुम्ही आतापर्यंत लोकांना रद्दी विकून पैसा कमावल्याचे ऐकले असेल; पण तुम्ही कधी गळणारे केस विकून पैसे कमावले, असे कधी ऐकले आहे का? हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल; पण खरंच एका तरुणीनं असं केलं आहे, जिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
या व्हिडीओत तरुणी सांगतेय की, दोन वर्षांपासून तिने केस विंचरताना गळणारे केस एका प्लास्टिकच्या डब्यात गोळा केले. त्यानंतर तिने ते डबाभर केस वजून करून विकले. त्याबदल्यात तिला चांगली रक्कम मिळाली.
केसांच्या बदल्यात कमावले इतके पैसे
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने लिहिले की, ती २०२३ पासून गळलेले केस गोळा करीत आहे. जेव्हा जेव्हा तिने केस विंचरले तेव्हा तेव्हा गळलेले केस जमा करून तिने एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवले. दोन वर्षांनंतर २०२५ मध्ये जेव्हा डबा केसांनी भरला, तेव्हा तिने ते केस विकण्याचा निर्णय घेतला.
व्हिडीओत पुढे सायकलवरून एक व्यक्ती डब्यातून केस काढून त्याचे वजन करताना दिसतो. केसांचे वजन ०.०७७ किलो इतके होते, ज्यासाठी मुलीला १९० रुपये मिळाले. ती व्यक्ती २,५०० रुपये प्रतिकिलो दराने केस खरेदी करते.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @being_earthfriendly नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आता तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हटले की, इतक्या केसांच्या बदल्यात जास्त पैसे दिले पाहिजे होते.
एका युजरने कमेंट केली की, ‘दोन वर्षांत जितके केस गोळा केले, ते मी तीन दिवसांत करू शकतो. दुसऱ्याने म्हटले की, तुम्हाला इतक्या केसांसाठी किमान १००० रुपये मिळायला हवे होते. तिसऱ्याने विनोदाने लिहिले की, माझी आई इतक्या केसांनी दोन ग्लास आणि एक फ्राईंग पॅन खरेदी करू शकली असती. तर शेवटी एकाने मिश्किलपणे लिहिले की, माझे केस ज्या वेगाने गळतायत, ते पाहता मी या व्यवसायाने करोडपती होईन.