Reddit Post Of Young Man Earning More Than RS 1 Lakh: एका २६ वर्षांच्या भारतीय तरुणाने त्याचे वैय्यक्तिक आयुष्य, पगार आणि नोकरीतील काही चांगले वाईट अनुभव रेडिट या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रेडिटवरील पोस्टमध्ये या तरुणाने सांगितले आहे की, काही नोकऱ्या बदलल्यानंतर त्याचा पगार ४० हजारांवरून १.३ लाख रुपयांवर पोहचला आहे. कागदावर त्याचे उत्पन्न तिप्पट झाले असले तरी, कर्ज आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे तो अजूनही एक प्रकारच्या चक्रात अडकलेला आहे आणि त्याला या वाढलेल्या कमाईचा आनंदही घेता येऊ शकत नाही.
या तरुणाने पोस्टमध्ये नमूद केले आहे की, त्याचे वडिल सतत आजारी असतात, त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च झाला असून, यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठे कर्ज आहे. त्याच्या मागील पगारातील बराचशी रक्कम ईएमआय आणि हॉस्पिटलच्या बिलांमध्ये जात असे. आताही, महागड्या शहरात स्थलांतर आणि राहणीमानाचा खर्च वाढल्याने, त्याला महिन्याला सुमारे ७०,००० ते ७५,००० रुपये खर्च येतो, ज्यामध्ये भाडे, अन्न, वाहतूक आणि अनेक ईएमआय यांचा समावेश आहे.
काटकसरीने जगणे, वाहतुकीवरील बचतीसाठी दुचाकी किंवा चारचाकीचा वापर आणि लक्झरी खर्च टाळणे या सर्व गोष्टी करूनही तो आर्थिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे. तरुणाने पोस्टमध्ये पुढे स्पष्ट केले आहे की, त्याला त्याची मासिक एसआयपी २००० रुपयांवरून १५,००० रुपये करायची आहे. त्याच्या पालकांसाठी वैद्यकीय विमा आणि कर्ज लवकर फेडण्याचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त, त्याला दोन वर्षांत लग्न करायचे असून, त्यासाठीही बचत सुरू करायची आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या तरुणाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेडिटवरील अनेक तरुण युजर्सनी त्यांचे आणि या तरुणाचे आयुष्य सारखेच असल्याचे कमेंटच्या माध्यमातून बोलून दाखवले आहे.
तरुणाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एक तरुण युजर म्हणाला, “तू तुझ्या पालकांचे कर्ज फेडत आहे. तू स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आणि चांगल्या प्रकारे जगण्यास सक्षम आहे. मी म्हणेन, एक व्यक्ती म्हणून, तू आयुष्यात यशस्वी झाला आहेस, भाऊ. ध्येय म्हणजे आनंदी राहणे आणि इतरांची काळजी घेणे.”