सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. जुगाड, मजेशीर व कौतुकास्पद बाबी आदी देश-विदेशांतील निरनिराळ्या गोष्टींची ते दखल घेत असतात. तसेच या घटनांकडे त्यांचा नेहमीच एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं. या गोष्टी समाजमाध्यमांवर पोस्ट करताना ते स्वतःचं मत मांडत असतात आणि हेच मत नेटकऱ्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं. आज आनंद महिंद्रा यांनी स्टार जिम्नॅस्ट दीपाचं कौतुक केलं आहे आणि तिच्या खडतर प्रवासाबद्दल त्यांचं मत मांडलं आहे.
स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा इतिहास रचला आहे. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीवाहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. दीपा कर्माकरनं उत्तर कोरियाच्या किम सोन-ह्यांगला मागे टाकीत अव्वल स्थान मिळवलं. तिच्या ऐतिहासिक विजयासह अनेक नामवंत व्यक्तींनी दीपा कर्माकरवर कौतुकाचा वर्षाव केला. त्याबरोबरच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही तिचं अभिनंदन केलं आहे. काय लिहिलं आहे त्यांनी या पोस्टमध्ये एकदा तुम्हीसुद्धा बघा.
पोस्ट नक्की बघा…
आनंद महिंद्रा यांनी आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपच्या समारंभातील एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, ‘आणखीन एक प्रेरणा… मार्चमध्ये दीपा कर्माकर तिच्या दुखापती व तिच्या खेळात येणारे अडथळे यांबद्दल बोलत होती. तेव्हा ती म्हणाली होती की, खेळावरील प्रेमच तिला पुढे चालवत राहील आणि काल ती प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट बनली. अशीच प्रगती करत राहा दीपा’, अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे.
२०१९ मध्ये बाकू येथे झालेल्या स्पर्धेतील सहभागामुळे तिच्या करिअरला धोका निर्माण झाला होता. त्यानंतर तिनं अनेक अडथळे पार केले; तथापि खेळावरील प्रेमानं तिला कधीही परावृत्त केलं नाही. २०२१ मध्ये झालेल्या गुडघ्यांच्या दोन शस्त्रक्रिया आणि डोपिंग उल्लंघन (डोपिंग म्हणजे खेळाडूने मादक द्रव्य, उत्तेजक पदार्थांचे सेवन केलं आहे का याची चाचणी). तर, या चाचणीमुळे कर्माकरला २१ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. अशा अनेक संघर्षांनंतर कर्माकरनं सुवर्णपदक मिळविलं आहे. समाजमाध्यमावर ही पोस्ट आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.