Dog Attacked By Leopard Video: ३ मे ला दरवर्षी बिबट्या दिन साजरा केला जातो, यंदा याच दिवशी बिबट्याची शक्ती दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एरवी असा एखादा शिकारीचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा लोक शिकार करणाऱ्याची वाहवा किंवा शिकार झालेल्याविषयी दुःख व्यक्त करतात पण या वेळेस मात्र व्हिडीओ काढणाऱ्यांवर व्हिडीओ बघणाऱ्यांनी तोफ डागलीये. हा अत्यंत अनैतिक प्रकार असून केवळ व्ह्यूजसाठी तुम्ही मुद्दाम मुक्या प्राण्याचा बळी दिला आहे अशीही टीका केली जातेय. वन्यजीवन अभ्यासक व प्राणीप्रेमींमध्ये सध्या या व्हिडीओची तुफान चर्चा चालू आहे. नेमकं हे प्रकरण काय आणि जंगलात दोन प्राण्यांमधील शिकारीची अचानक इतकी का चर्चा होतेय हे पाहूया..

बिबट्या दिनाच्याच दिवशी @safariwithhemantdabi या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, व्हायरल झाल्यावर अनेकांनी हीच क्लिप रिपोस्ट केली होती. @safari_with_ajay.sariska या अकाऊंटवरून @indian_wildlifes ने हा व्हिडीओ रिशेअर करताना या व्हिडीओमधील सर्वात गंभीर प्रश्नाविषयी भाष्य केलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे अशी सूचना देत लिहिले होते की, “जंगलाच्या इतक्या आतमध्ये जिथे हिंस्त्र प्राणी असतात तिथे भटक्या कुत्र्यांना किंवा गुराढोरांना प्रवेश करता येणार नाही यासाठी वनविभागाने अधिक कठोर नियम केले पाहिजेत. तसेच जंगलात केलं जाणारं व्हिडीओ शूटिंग हे नैतिकतेचे पालन करून केले जाईल यासाठी सुद्धा उपाययोजना करणे आवश्यक आहे.”

सदर व्हिडीओ हा जयपूर, राजस्थानमधील झालना येथे शूट केलेला आहे. यामध्ये एक कुत्रा सुरुवातीला चालत येताना दिसतो व अचानक तो व्हिडीओ काढणाऱ्यांना बघून पुढे येऊन थांबतो तितक्यात मागून बिबट्या त्याच्यावर हल्ला करून त्याची मान आपल्या तीक्ष्ण दातांमध्ये धरून निघून जातो. हे सगळं घडत असताना लोकांनी आधीच सावध करण्यापेक्षा, तिथून हाकलून त्याचा जीव वाचवण्यापेक्षा त्याला बिबट्याची शिकार होऊ दिलं व याचा व्हिडीओ काढला या गोष्टीवर सध्या टीका होतेय.

मन मजबूत असेल तरच पाहा हा Video

दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी हा प्रकार ठरवून केला गेलाय असं वाटतं अशीही शंका व्यक्त केलीये. काही युजर्सने लिहिल्याप्रमाणे जो माणूस व्हिडीओ काढत होता त्याला हे घडणार हे अगोदरच माहीत असणार अन्यथा कुणी भटक्या कुत्र्याचा व्हिडीओ शूट का करेल? असा प्रश्न केला आहे. तर काहींनी असाही अंदाज वर्तवलाय की, “या कुत्र्याला मुद्दाम कुणीतरी जंगलात आणून सोडलं असणार कारण एक भटका कुत्रा ज्याला माहित असतं की जंगलात इतक्या आतमध्ये नक्कीच शिकारी असणार तो मुद्दाम आत जाणार नाहीच. शिवाय त्याच्या चेहऱ्यावरच संभ्रमित भाव दिसतायत.” काहींनी टीका करत व्हिडीओ काढणाऱ्यांना अनैतिक म्हटले आहे ज्यावर उत्तर देताना इंडियन वाईल्डलाईफ पेजने पुन्हा एकदा हा व्हिडीओ जागृती करून वन्यविभागाने दखल घ्यावी यासाठी पोस्ट केल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा<< तुम्हाला सर्वात आधी दिसलेला प्राणी तुमच्या स्वभावाविषयी गुपित सांगतो! प्रगतीसाठी स्वतःची ‘ही’ परीक्षा घ्या, उत्तर वाचा

@faiz_114113 नावाच्या एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना काही व्याघ्रप्रकल्पांमधील दुरावस्थेविषयी सुद्धा भाष्य केलं आहे. युजरने लिहिले की, “मनुष्य विरुद्ध प्राणी अशा संघर्षाचे केंद्र असलेल्या ताडोबा किंवा पेंच बांधवगड कान्हा पन्ना व्याघ्र प्रकल्पात असे प्रकार घडताना कधीच पाहिलेले नाहीत. पण रणथंबोर आणि अलीकडे पिल्लीभीत येथे मुद्दाम अशाप्रकारे पर्यटकांना शूट करता यावे म्हणून पाळीव प्राणी जंगलात आणले जातात. रणथंभोर वन विभाग तर सर्वात वाईट आहे आणि मुळात तिथल्या वाघांबाबतही अत्यंत निष्काळजीपणा केला जातो ज्यामुळे, अनेक वाघांचा मृत्यू झाला आहे.”