BKC Traffic Problem: मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) अनेक कॉर्पोरेट कंपन्याचे कार्यालये आहेत. दक्षिण मुंबईला पर्याय म्हणून बीकेसीचा विकास करण्यात आला होता येथे अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यासाठी हा भाग ओळखला जातो. तसेच आलिशान हॉटेल आणि गृहसंकुलासाठीही हा परिसर प्रसिद्ध आहे. मात्र आता बीकेसी परिसर बंगळुरू पेक्षाही अधिक त्रासदायक असल्याचा सूर सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. रेडिटवर काही जणांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मुंबईच्या वांद्रे आणि कुर्ला या दोन्ही स्थानकांपासून जवळ असल्यामुळे मुंबईच्या दृष्टीने प्रवासासाठी सोयीस्कर भाग म्हणून याकडे पाहिले गेले. मात्र तरीही बीकेसीमध्ये प्रवास करणे अवघड असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत. एका रेडिट युझरने याठिकाणी नोकरीला जाताना विचार करावा, अशी पोस्ट केली आहे.

बीकेसीमध्ये कधीही नोकरी करू नका

पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तुम्ही जर बीकेसीपासून जवळ असलेल्या वांद्रे, खार, सांताक्रूझ किंवा विलेपार्ले येथे राहत नसाल तर बीकेसीमध्ये नोकरी करण्याचा अजिबात विचार करू नका.

या व्यक्तीने पुढे म्हटले, याठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या आहे. बीकेसीतून स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस नेहमीच वाहतूक कोंडीत अडकतात. तसेच बाईक, कार आणि टॅक्सीही वाहतूक कोंडीत फसतात. तसेच सामान्य नोकरदारांना रिक्षाचा मोठा आधार आहे. पण येथील रिक्षाचालक मनमानी करतात. ते भाडे घेत नाहीत. रिक्षाचालक तयार झालेच तर अधिकच्या पैशांची मागणी करतात.

रेडिट युजरने पुढे म्हटले, जर रोज नोकरीसाठी इथे प्रवास करायचा असेल तर तणावाचा सामना करावा लागतो. जर तुमच्या ऑफिसमध्ये वेळेत पंच इन करणे बंधनकारक असेल तर तुम्हाला नाहक त्रास भोगावा लागू शकतो. तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होणार नाही. मी अनेकांना गच्च भरलेल्या बसेसमधून नाईलाजाने प्रवास करताना पाहिले आहे.

Don't ever.. ever take a job in BKC.
byu/ntshpower inmumbai

या पोस्टवर काही इतर युजरच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांनीही हाच सूर आळवला आहे. एका युजरने या पोस्टखाली कमेंट करताना म्हटले की, बीकेसीमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतो. इथले नियोजन पूर्णपणे फसलेले आहे. सायकल लेन रस्त्याच्या मधोमध आहेत. पॉड टॅक्सी स्वप्नातच आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. तर शेअर ऑटो माफिया झाले आहेत.

एका युजरने म्हटले की, मी बीकेसी जवळच राहतो, तरीही मी तिथली नोकरी स्वीकारत नाही. आणखी एका युजरने लिहिले की, दशकभरापूर्वी बीकेसीमध्ये नोकरी मिळवणे हे मुंबई आणि लगतच्या परिसरासाठी स्वप्नासारखे होते. परंतु आता इथली परिस्थिती विचित्र बनली आहे. माझ्या ओळखीचे अनेक लोक म्हणतात की, तुमचे स्वतःचे वाहन असेल तरच याठिकाणी कामाला या.

बीकेसी विरुद्ध बंगळुरू

बंगळुरूमध्ये काम केलेल्या एका माजी कर्मचाऱ्याने या दोन हबची तुलना केली आहे. मी आधी बंगळुरूत असताना तिथल्या वाहतूक व्यवस्थेविषयी तक्रार करायचो, पण जेव्हापासून मी बीकेसीमध्ये आलो, तेव्हा मला वाहतूक कोंडीची खरी वेदना समजू लागली.