Elderly Husband Wife Emotional Video Viral : पती-पत्नीचं नातं फार भावनिक असतं. या नात्यात भांडणाबरोबर प्रेम, माया, ममत्व अशा अनेक गोष्टी असतात. काहीही झालं तरी या नात्यात पती खचला तर पत्नी सावरण्यासाठी तयार असते, तर पत्नीवर कठीण प्रसंग ओढवला तर पती सावरून घेत असतो; त्यामुळे कोणत्याही अटी शर्तींशिवाय अनेक वर्ष हे नातं टिकताना दिसतं. याला काही अपवाद असू शकतात, पण बहुतांश जोडपी अगदी वृद्ध होईपर्यंत काही झालं तरी एकमेकांची साथ सोडत नाहीत. सध्या अशाच एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत वृद्ध पत्नीला गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे, पण यावेळी ती खचू नये यासाठी पती किती निःस्वार्थ भावनेने तिची काळजी घेतोय, धीर देतोय हे दिसते. हा व्हिडीओ बिहारमधील आरा भोजपूरमधील आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये वृद्ध पती आपल्या आजारी पत्नीला धीर देताना दिसत आहे. तो आपल्या पत्नीचा हात धरून तिच्या कानाजवळ जातो आणि तिला काळजी करू नकोस, मी आहे ना, तुला काहीही होऊ देणार नाही, तू पूर्णपणे बरी होशील असे म्हणत तिला जगण्यासाठी एकप्रकारे बळ देतोय. या कठीण काळात तिला एकटं वाटू नये यासाठी प्रयत्न करतोय. दोघांमध्ये भोजपुरी भाषेत हे अतिशय भावनिक संभाषण सुरू होतं.

वृद्ध पत्नी मेडिकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. यात पतीचं वय ७५ आणि पत्नी ७० वर्षांची आहे. हा व्हिडीओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत. अनेकांनी आजच्या पिढीने या जोडप्याकडून खरं प्रेम काय असतं हे शिकलं पाहिजे असं म्हटलं आहे; तर अनेकांना हा व्हिडीओ पाहून अश्रू अनावर होत आहेत.

व्हायरल व्हिडीओबाबत डॉ. एस. एम. पाठक यांनी सांगितले आहे की, महिलेची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, पती प्रत्येक क्षणी पत्नीबरोबर राहून तिला प्रोत्साहन, धीर देत राहिला, हे पाहून अनेक लोक भावनिक झाले. काही लोकांनी त्या क्षणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांनी पुढे सांगितले की, महिलेला ब्रेन इन्फेक्शन आहे, तिच्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाणही कमी होते, त्यामुळे ती बेशुद्ध पडली, तिला बरं करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जात होते. तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. अशी आशा आहे की, ती लवकरच पूर्णपणे बरी होईल आणि तिच्या पतीसह घरी जाईल.