Viral Video : दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात, त्यामुळे भारतातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर गेलं तरी रेल्वे गाड्या आणि प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हमखास गर्दी पाहायला मिळते. कामावर जाण्याची घाई किंवा घरी परतण्याची धडपड, अनेकदा लोक चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यामुळे त्यांचाच जीव धोक्यात जातो. नुकतेच सोशल मीडीयावर एक कर्नाटकमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दावणगेरे रेल्वे स्टेशनवरील असाच एका धोकादायक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रेल्वेत चढत असताना तोल जाऊन खाली पडल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर पडताना तो दुसर्या एका व्यक्तीला सोबत घेऊन पडतो. यादरम्यान आजूबाजूला असलेले लोक वेळीच या दोघांना वाचवण्यासाठी धावतात. ही घटना @desi_cravings_ या व्लॉगरच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या एकंदरीत घटनेने चालत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे प्रवाशांसाठी कसे धोकादायक ठरू शकते हेच पुन्हा एकदा पाहायला मिळते.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना व्लॉगरने लिहिले की, “आज दावणगेरेमध्ये चालत्या ट्रेनचा व्हिडीओ घेताना, मी असे काहीतरी पाहिले जे मी कधीही विसरणार नाही. माझ्या डोळ्यासमोर एक माणूस ट्रेनमधून पडला. हा एक भयानक आणि हृदयाचा थरकाप उडवणारा क्षण होता. ही एक चालत्या ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहणे किंवा प्रवास करणे किती धोकादायक असू शकते याची आठवण करून देणारी घटना होती. सुदैवाने मदत लवकर पोहोचली आणि जवळपासचे लोक त्याला मदत करण्यासाठी धावले,” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
दरम्यान या थरारक व्हिडीओला सोशल मीडियावर १७ मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी या वृद्ध व्यक्तीने दुसर्या प्रवाशाचा जीव वाचवल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. अंकलचे धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हते, पण पडण्याचे कारण ते नव्हते असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. इतरही अनेकांनी या व्हिडीओखाली अशाच कमेंट केल्या आहेत.
यापूर्वीही धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात अनेकदा भीषण अपघात घडले आहेत. मार्च महिन्यात घडलेल्या एका घटनेत नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एका ६२ वर्षीय व्यक्तीला आपले पाय गमवावे लागले होते. ही घटना प्लॅटफॉर्म १४ वर घडली होती. हा व्यक्ती रेल्वेच्या रुळांच्या मध्ये जखमी अवस्थेत आढळल होता.