‘एकी’ हीच हत्तींच्या कळपातली खरी ताकद आहे म्हणून हत्ती नेहमी कळपात राहतात, कळपातच चाऱ्याच्या शोधात निघतात. कळपात राहणाऱ्या हत्तीण आपल्या पिल्लाबरोबरच इतरांच्याही पिल्लाची काळजी घेतात. ‘संवेदना’, ‘श्रवणशक्ती’ आणि ‘एकी’ या अनोख्या ताकदीवर हत्तीचा कळप कोणत्याही परिस्थितीत जंगलात तग धरून राहू शकतो. म्हणूनच अनेकदा कोणत्याही संकटांशी एकट्याने लढणाऱ्या हत्तीचे व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या एकीची प्रचिती आली आहे.
दक्षिण कोरियातल्या ग्रँट पार्क प्राणीसंग्रहालयातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हत्तीण आणि तिचं पिल्लू संग्रहालयात असणाऱ्या तलावाशेजारी पाणी पित होतं, अचानक या पिल्लाचा पाय घसरला आणि ते तळ्यात जाऊन पडलं. लहान असल्याने त्याला नीट पोहताही येईना, पाण्यात ते गटंगळ्या खाऊ लागलं. या पिल्लाला कसं वाचवायचं हे हत्तीणीला कळलं नाही. ती मदतीसाठी चित्कारू लागली. त्याचबरोबर शेजारी असलेली हत्तीण धावून आली आणि या दोघींनी मिळून अत्यंत शांतपणे या पिल्लाला तळ्यातून सुखरूप बाहेर काढलं. असं दृश्य फारच क्वचित पाहायला मिळतं. तेव्हा या प्राण्याच्या समन्वयांच्या दृश्य पाहून सगळेच चकित झाले नसतील तर नवल.