जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक तसेच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीच्या टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या एलन मस्क यांनी नुकताच पुण्यातील एका मराठमोळ्या इंजिनियरला ट्विटरवरुन रिप्लाय दिलाय. एलन यांनी पुण्यातील प्रणय पाटोळे या इंजिनियरला रिप्लाय दिलाय. प्रणयने एलन यांना टॅग करुन काही ट्विट केले होते. ऑनलाइन पैशांच्या व्यवहारांसाठी मोठ्या आकाराच्या यंत्रणा उभारण्याची गरज नसल्याचे एलन यांना त्यांच्या तरुण्यामध्येच लक्षात आल्याचं या ट्विट्समध्ये प्रणयने म्हटलं होतं. आपण पैसा ज्यापद्धतीने सध्या ऑनलाइन माध्यमातून पाठवतो तो बदल घडवून आणण्यामागे एलनचा मोठा हातभार असल्याचं प्रणयने म्हटलं आहे. तसेच प्रणयने क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलनासंदर्भातील तज्ज्ञांना प्रश्न विचारला आहे. एलनवर विखारी आणि द्वेष पसरवणारी टीका करणाऱ्या अब्जाधीशांनी स्वत: काय मिळवलं आहे हे क्रिप्टोकरन्सी तज्ज्ञांनी विचारलं पाहिजे असं प्रणयने म्हटलं आहे.

प्रणयने या ट्विटमध्ये एलन यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात बँक ऑफ नेवा सोटीयामध्ये केलेल्या समर इनटर्नशीपसंदर्भात भाष्य केलं आहे. या ठिकाणी काम करताना सध्या टेस्ला आणि स्पेस एक्सच्या सीईओपदी असणाऱ्या एलनला तासाचे १४ अमेरिकन डॉलर दिले जायचे. एलनला फक्त आपल्या डोक्यातील भन्नाट कल्पना त्याच्या बॉसेससमोर मांडण्याचं काम देण्यात आलेलं. या ज्ञानामुळेच एलनने कंपनी स्थापन करण्यासंदर्भातील आपला पाया मजबूत केला.

पैसा कसा काम करतो हे आपल्या सर्वांपेक्षा एलनला चांगल्या पद्धतीने ठाऊक असल्याचंही प्रणयने म्हटलं आहे.

प्रणयने केलेल्या या ट्विटला एलननेही रिप्लाय दिलाय. या रिप्लायमध्ये एलनने त्याच्या इनटर्नशीपमुळे त्याला कसा फायदा झाला यासंदर्भात त्याने केलेल्या भाष्याबद्दलच्या वृत्तांकनाची लिंक शेअर केलीय. एलनने या ट्विटमध्ये मला पीटर निकोल्सन यांच्यासोबत काम करताना आनंद मिळाल्याचं म्हटलं आहे. पीटर हे त्यावेळी बँक ऑफ नेवा सोटीयामध्ये वरीष्ठ अधिकारी होते. मात्र त्याचवेळी एलनने आपण बँकेला चांगल्या संकल्पना दिल्या तरी त्यांनी मला देण्यात येणाऱ्या मानधानामध्ये वाढ केली नव्हती अशी खंतही बोलून दाखवलीय. “मी पीटर निकोल्सन यांच्यासोबत काम केलं असून ते भन्नाट होते. आम्ही एकमेकांना गणिताची कोडी घालायचो. मी बँकेला भरपूर नफा होणाऱ्या कल्पना दिल्या मात्र त्यांनी मला किमान तासाचा एक डॉलर तरी वाढवून द्यायला हवा होता,” असं एलनने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये क्रिप्टोकरन्सीसंदर्भात बराच गोंधळ सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रणयने हे ट्विटस केले होते. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकदारांनी एलनवर टीका केली आहे. एलनने बिटकॉइन्ससंदर्भात केलेल्या नकारात्मक वक्तव्यामुळे जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं टीकाकारांचं म्हणणं होतं. वातावरण बदलासंदर्भातील कारण देत टेस्लाने बिटकॉइन्समध्ये व्यवहार करणं बंद केलं. कंपनीकडे असणाऱ्या बिटकॉइन्सपैकी काही किंवा सर्व बिटकॉन्सची विक्री केली जाणार असल्याचंही एलनने एका ट्विटरवरील संवादामध्ये म्हटलं. मात्र त्यावरुन गोंधळ निर्माण होऊन बिटकॉइन्सचे भाव पडल्यानंतर एललने ट्विट करुन कंपनीने अद्याप एकही बिटकॉइन विकला नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि बिटकॉइन्सचे दर मोठ्याप्रमाणात कोसळल्याने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालेलं.