टेस्ला, स्पेसएक्स या कंपन्यांचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आता त्यांच्या नव्या व्यवसायामुळे ते चर्चेत आले आहेत. मस्क आता चक्क परफ्युम विकणार आहेत. मस्क यांनी एक नवा परफ्युम लाँच केला आहे. सोशल मीडियातून त्यांनी ही माहिती दिली आहे. इलॉन मस्क सेल्समन बनले असल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे. कारण इलॉन मस्क यांनी स्वतःला सेल्समन असे म्हटले आहे. मस्क यांनी त्यांच्या ट्वीटर बायोमध्ये बदल करून स्वतःला परफ्यूम सेल्समन असे म्हटल्याचे दिसते आहे.

मस्क यांनी त्यांच्या बायोमध्ये परफ्यूम सेल्समन असे नमूद केल्याने आता इलॉन मस्क परफ्यूम विकणार का? अशा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर यामुळे मस्क सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आले आहे. इलॉन मस्क यांनी एक ट्वीट देखील केले आहे. यामध्ये त्यांनी एका परफ्यूमच्या बॉटलचा फोटो पोस्ट केला असून त्याला पृथ्वीवरील सर्वोत्तम सुगंध,असे कॅप्शनही दिले आहे.

आणखी वाचा : काय सांगताय!! झोमॅटोचे सीईओ करतात चक्क होम डिलिव्हरी

मस्क यांनी ट्विट केलेल्या फोटोत बर्नट हेअर परफ्यूम असं नाव असलेल्या एक परफ्यूमची बॉटल दिसत आहे. हा परफ्यूम ‘द बोरींग कंपनी’ या ब्रंडचा आहे. त्याची किंमत १०० डॉलर म्हणजे ८,४०० रुपये आहे. त्यात आंतरराष्ट्रीय शिपिंज चार्जेसचे ३००० रुपये स्वतंत्र लावले जातील. म्हणजेच या परफ्युमच्या एका बॉटलची किंमत भारतीय ग्राहकांना ११,४०० रुपयांना मिळेल.

या पोस्टनंतर मस्क यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत १० हजारहून अधिक बॉटल्सची विक्री झाल्याची माहिती दिली आहे. या बॉटल्सचे वितरण २०२३ च्या पहिल्या तिमाहीमध्ये होणार आहे. DOGE या क्रिप्टोकरन्सीद्वारेही या परफ्युमची खरेदी करता येईल.