Emotional Friendship Video Viral : आयुष्यात मैत्री फार गरजेची असते. कारण तीच आपल्याला सुख- दुःखात अनेकदा साथ देते. आयुष्यातील अनेक आनंदाचे क्षण, अनुभव, शांती मैत्रीत मिळतात. आयुष्यातील अनेक वळणांवर मित्र-मैत्रिणींची साथ मिळते. अनेकदा मित्राने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. सध्या सोशल मीडियावर दोन मित्रांचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राला दिलेले वचन अशावेळी पाळले, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
‘मृत्यू’ ही खरंच हृदयद्रावक आणि काळजावर खोलवर परिणाम करणारी घटना असते. अशा परिस्थितीत कोणालाही कोणाच्याही अंत्ययात्रेत नाचण्याचे मन करणार नाही. परंतु मध्य प्रदेशात एक मित्र आपल्या मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याच्या अंत्ययात्रेत चक्क डोळ्यात अश्रू दाटून नाचताना दिसला, हे काळजाला स्पर्श करणारं दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी या भावनिक क्षणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान मृत्यूआधी मित्राने याबाबतचे एक पत्रही लिहिले, तेही खूप व्हायरल होतेय.
आयुष्यात दोन प्रकारचे मित्र असतात, एक नावाला मैत्री जपणारे आणि दुसरे मित्रासाठी जीवाला जीव देणारे. यात जीवाला जीव देणारे मित्र सुखात नाही पण दुःखात तुमच्या बरोबर असतात. या व्हिडीओतही असंच काहीसं दृश्य पाहायला मिळालं.
व्हिडीओत पाहू शकता, एक मित्र आपल्या मित्राच्या अंत्ययात्रेला पोहोचला आणि त्याला आपल्या मित्राने दिलेले वचन आठवले. एकीकडे मित्र गमावल्याचे दुःख, पण आपल्या जिवलग मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो मित्र त्याच्या अंत्ययात्रेत नाचू लागला. यावेळी त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते, पण तो थांबला नाही. या भावनिक क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांना अश्रू आवरणं कठीण जात आहे.
हा हृदयद्रावक व्हिडीओ @comedyculture.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला तर अनेकांनी त्यावर भावनिक कमेंट्स केल्या आहेत.
एकाने लिहिले की, तो किती मानसिक आघातातून जात असेल याची कल्पना करा. दुसऱ्याने म्हटले की, हीच खरी मैत्री आहे. तिसऱ्याने म्हटले की, हे माझ्या मध्य प्रदेशातील मंदसौर शहरात घडले… एक हृदयद्रावक क्षण पण सुंदर श्रद्धांजली. मृत्यूनंतरही खरी मैत्री संपत नाही, तर ती दिलेल्या वचनांमुळे जिवंत राहते.