– प्रेम राजेंद्र जोशी
डोंबिवलीत पेंडसेनगरमध्ये आम्ही राहतो व आमचा बांधकामाचा व्यवसाय आहे. आम्ही घरात पाच वर्षांच्या माझ्या मुलासह पाच जण आहोत. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये आम्ही कंटाळलो मग कंटाळा घालवण्यावर आम्ही एक शक्कल लढवली. आणि आता आम्ही गेले महिनाभर फूल टू धमाल करतोय… बघा तुम्हाला कशी वाटते आमची आयडिया…
माझी मोठी बहीण ठाण्याला राहते, तिनं आमच्या सगळ्या कुटुंबाचा व्हॉट्स अॅप ग्रुप केला आणि सगळ्यांना टास्क द्यायला सुरूवात केली. आम्ही सगळे मिळून ३० जणं आहोत., नी ती आम्हाला रोज नवनवीन टास्क देते. कधी चित्र काढायचं असतं, कधी डान्स करायचा असतो, कधी नाटक सादर करायचं असतं तर कधी एकमेकांबद्दल भावना व्यक्त करायच्या असतात. विशेष म्हणजे आमच्या या कुटुंबाच्या ग्रुपमध्ये एकूण ३० जणं आहेत, ज्यात चार ज्येष्ठ नागरिक आहेत नी दहा वर्षांखालील सहा मुलं आहेत.
या रोज दिल्या जाणाऱ्या टास्कमध्ये आमच्यापैकीच एकजण जज असतो. मग काय सुरू होते टास्क पूर्ण करायची धमाल नी सहा वर्षांच्या मुलांबरोबर ६७ वर्षांच्या ज्येष्ठापर्यंत सगळेच जण सहभागी होतात. खरं सांगतो संपूर्ण महिना कसा गेला आम्हाला कळलं देखील नाही.
सुरुवातीला गंमत म्हणून मी आमचे टास्क फेसबुकवर टाकायचो पण त्याला इतका सकारात्मक प्रतिसाद मिळाला की आता तर आमचे मित्रमंडळी आमचा व्हिडीओ कधी येईल याची वाट बघत असतात.
मि. बीन्सचा एक परफॉर्मन्स खास लोकसत्ता डॉट कॉमसाठी इथं सादर केलाय.
मी JOSHI’S PAGALWORLD या नावानं youtube channel ही सुरू केली नी अनपेक्षितरीत्या या ल़ॉकडाउनमुळे आमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असल्याचा साक्षात्कार आम्हाला झालाय. म्हणजे आता तर असं वाटतंय की हा लॉकडाउन संपूच नये, एवढे गुंतलो आहोत आम्ही.
गेल्या महिन्याभरात व्हिडीओ व फोटो मिळून जवळपास १५० इतका डिजिटल अनुभव आम्ही गोळा केलाय. करोनाचं हे संकट दुर्दैवी आहे, लॉकडाउनला पर्याय नाहीये अशा स्थितीत रडत बसायचं की, “लिया भोगासी असावे सादर” म्हणत आहे, प्रतिकूल परिस्थितीचाही अनुकूल वापर करायचा हे आपल्यावर आहे. तुम्ही पण सगळ्यांनी या लॉकडाउनकडे इष्टापत्ती म्हणून बघा, नी घरच्या घरी धम्माल करा, एवढीच विनंती!