Fake Police Scam In Virar Video : मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसतेय. त्यात काही लोक अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजपणे अडकताना दिसतात. दरम्यान, मुंबईसारख्या शहरात अशाही काही टोळ्या सक्रिय आहेत, ज्या पोलिसांच्या वेशात घरोघरी जाऊन पैसे गोळा करताना दिसतात. लोक त्यांना खरे पोलीस समजून पैसे देतानाही दिसतात, ज्यातून नागरिकांची फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, विरारमधील अशाच नकली पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विरार-पूर्वेकडील पाचपायरी परिसरातील हा व्हिडीओ आहे. जिथे खऱ्या पोलिसांप्रमाणे कपडे घातलेली दोन व्यक्ती सरळ एका इमारतीत शिरल्या. हातात वही घेऊन ते घरोघरी जाऊन पैसे मागत होते. या दरम्यान, इमारतीतील एका महिलेसह काही पुरुषांनी त्यांना ओरडताच ते काही न बोलता, सरळ इमारतीबाहेर निघून गेले. व्हिडीओ पाहून लोक त्यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्सनी म्हटले की, हे बहुरूपी लोक आहेत. त्यांना तुमच्या इच्छेनुसार पैसे द्यायचे असतात; पण असं अपमान करणं योग्य नाही. दरम्यान, अनेक जण त्यांची टोळी वसई, विरार, पालघर या भागांत सक्रिय असल्याचे सांगतात.

व्हिडीओत पाहू शकता की, विरारमधील पाचपायरी परिसरातील एका सोसायटीत दोन नकली पोलीस हातात वही घेऊन पैसे मागण्यासाठी पोहोचले. ते एका महिलेच्या घरी जाऊन, पोलीस असल्याचे भासवून पैसे मागू लागले. हे ऐकून महिला भडकली आणि तिने आल्या पावली त्यांना हाकलून लावले. यावेळी तिने त्यांचा चेहऱ्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत तो तोतया पोलीस इमारतीबाहेर पडून निघून गेले.

@virarmerijaan नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ते नकली पोलिस नाहीत ते बहुरूपी नावाचा बिल्ला घेऊन लोकांकडे पैसे मागत फिरतात आणि सांगतात की, ते पैसे गरजू मुलांना जेवण देण्यासाठी वापरतात. काही महिन्यांपासून त्यांची ही टोळी वसई-विरारच नव्हे, तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील लहान लहान खेडोपाड्यांत फिरत आहे. त्यांची एक मोठी टोळी रोज सकाळी ७ ते ९ यादरम्यान विरार फाटा येथे नेहमी उभी असते. पोलिस प्रशासनाच्या गाड्या रोज यांच्या बाजूला असूनसुद्धा मला वाटत नाही की, पोलिस यंत्रणेला याची माहिती नसावी. जवळच पेल्हार पोलिस ठाणे, शिरसाट फाटा पोलिस ठाणे, विरार कणेर पोलिस ठाणे आहेत.

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, वसई, नालासोपारा व विरारमध्ये हे जास्त फिरत असतात. पोलिस ठाण्यामध्ये कळवलं तर ते बोलतात की, परत आले की सांगा आम्हाला. काही कारवाई नाही ना कोणती तक्रार घेतली. तिसऱ्याने लिहिले की, भीक मागताना आम्ही बहुरूपी आहोत, असं सांगून जर पैसे मागितले तरीही लोक देऊ शकतात; पण पोलीस अहो, असं सांगून फसवणूक करतायत हे योग्य नाही.

तिसऱ्याने लिहिले की, अतिशय चुकीचा प्रकार आहे हा; परंतु हा अशा पद्धतीने खाकी युनिफॉर्म घालून लोकांकडून पैसे मागत आहे. ते खरं तर बहुरूपी आहेत त्याप्रमाणे त्यांच्याकडे त्या प्रकारचे कार्ड असते मात्र, सध्या काही बेरोजगार लोक या बहुरूपी लोकांची नक्कल करून, खाकी वर्दी घालून लोकांना घाबरवून पैसे गोळा करण्याचा प्रकार चालू आहे. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बहुरूपी लोक कोणाची फसवणूक करीत नाहीत. ते लोक लोकांचं मनोरंजन करून पैसे मागून आपला उदरनिर्वाह करीत असतात.