उत्तर प्रदेशातील हापूर इथे एक अजब गजब घटना घडली आहे. एका व्यक्तीने चक्क २९ स्टीलचे चमचे, १९ टूथब्रश आणि २ पेन गिळले. या व्यक्तीच्या पोटात दुखू लागल्यावर डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड केले आणि त्यानंतर ही बाब समोर आली आहे. हे सत्य समोर आल्यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीवर तात्काळ शस्त्रक्रिया करत हे सर्व त्याच्या पोटातून बाहेर काढलं. आहे. तब्बल चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. मात्र, इथे प्रश्न असा आहे की इतके चमचे आणि टूथब्रश या व्यक्तीने कसे आणि का गिळले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व गिळून तो जिवंत कसा राहिला?

हापूर इथला रहिवासी असलेला ३५ वर्षीय सचिन हा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले. तिथे रूग्णांना कमी प्रमाणात अन्न दिल्याने त्याला तिथे सोडल्याचा राग आला. “दिवसभरात खूप कमी भाज्या आणि काही चपात्या दिल्या जात. जर आमच्या घरून काही आले तर ते आमच्यापर्यंत क्वचितच पोहोचतं. आम्हाला कधी कधी दिवसातून एक बिस्किट मिळायचे”, असे सचिन याने सांगितले.

या प्रकारामुळे संतापलेला सचिन नंतर स्टीलचे चमचे चोरायचा आणि बाथरूममध्ये जाऊन त्यांचे तुकडे करून तोंडात ठेवायचा आणि घशात ढकलायचा. काही दिवस सचिनने असे केले. त्यानंतर त्याला पोटात दुखू लागल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. एक्स-रे आणि स्कॅन केल्यानंतर त्याच्या पोटात चमचे, टूथब्रश आणि पेन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

सुरूवातीला एन्डोस्कोपीद्वारे त्याच्या पोटातल्या वस्तू काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र डॉक्टरांना यात यश आले नाही. शेवटी डॉक्टरांना इतर शस्त्रक्रियेद्वारे या सर्व वस्तू त्याच्या पोटातून बाहेर काढाव्या लागल्या. या शस्त्रक्रियेला तब्बल चार तास लागले. “अशा अडचणी अनेकदा मानसिक समस्या असलेल्या लोकांमध्ये उद्भवतात. शस्त्रक्रियेनंतर तो बरा असून त्याला घरी पाठवण्यात आले आहे”, असे सचिनवर शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णालयातील डॉ. श्याम कुमार यांनी म्हटले.