Farmer Risking His Life To Save Crops Viral Video : शेती, शेतकरी यांच्या समृद्धीवरच देशाचा विकास अवलंबून असतो. पण, शेतकऱ्याचं घरसुद्धा याच शेतीवर चालत असते. अनेकदा मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. राज्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त होऊन जातात. परिणामी कित्येकदा हातातोंडाशी आलेली पिकं माना मोडून पडलेल्या स्थितीत पाणी भरलेल्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय त्यांच्या हाती काही नसतं. आज सोशल मीडियावर हेच दृश्य दाखविणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिसणारं दृश्य पाहून तुमचेही डोळे पाणावतील एवढं तर नक्की…
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, पावसामुळे शेतकऱ्याचे वर्षभराचे कष्ट वाहून जाताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर वाहून जाणाऱ्या शेतातून उरलं सुरलेली शेतात आलेली भाजी स्वतःजवळ घेण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरूच आहे. व्हिडीओत एका पुलावर झोपून पावसात वाहून जाणारी भाजी उचलून स्वतःजवळ घेताना दिसत आहे. अशा प्रकारे जलप्रवाहातून जाणाऱ्या भाज्यांच्या अनेक जुड्या त्यानं उचलून एका बाजूला ठेवल्या आहेत.
शेतकरी पैशांनी जमीन घेऊन त्या जागेत भाजी, फळे, अन्नाची लागवड करतो. पण, पावसामुळे त्याचे शेत वाहून जाते आणि मग त्याला भरपूर नुकसान सहन करावे लागते. असेच काहीसे या शेतकऱ्याबरोबर घडले आहे. पावसामुळे शेतकऱ्याने लावलेली भाजी वाहून जाते आहे. हे पाहून जलप्रवाहातून तो जमेल तितकी भाजी, स्वतःचा जीव धोक्यात घालून उचलताना दिसतो आहे. कारण- त्याच्यासाठी त्या एका भाजीच्या जुडीची किंमतही मोठी आहे. एकदा बघाच शेतकऱ्याचा हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
भूक लागली नसेल किंवा पोट भरले की, आपण सहज अन्न कचराकुंडीत फेकून देतो. पण, पावसात आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाचे रक्षण करण्यासाठीचा हा हताश प्रयत्न पाहून तुम्हीही अन्न टाकताना पुढच्या वेळी नक्कीच विचार कराल. हातातोंडाशी आलेलं पीक वाहून जाताना निव्वळ बघण्याऐवजी तो प्रत्येक भाजीची जुडी वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. इतर माणसंही त्याला मदत करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ax_manish_4 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.