Farmers Son Inspiring Story To Reach NASA: संपूर्ण भारतातून नासाच्या ह्युमन एक्स्प्लोरेशन रोव्हर चॅलेंज (HERC) साठी १३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील दोन विद्यार्थ्यांची कहाणी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. ग्रेटर नोएडातील VRSB इंटर कॉलेज मध्ये शिकणारा १५ वर्षीय उत्कर्ष आणि ग्रेटर नोएडातील कॉलेज आणि नोएडाच्या सेक्टर १२ मधील भौरव देवरस सरस्वती विद्या मंदिर शाळेत इयत्ता अकरावीत शिकणारा १६ वर्षीय ओम कुमार या दोघांना नासकडून ही संधी उपलब्ध झाली आहे.

HERC म्हणजे काय?

HERC ही यूएस स्पेस एजन्सी नासाची वार्षिक अभियांत्रिकी डिझाईन स्पर्धा आहे, ज्यात संपूर्ण युनायटेड स्टेट्स आणि जगभरातील विद्यार्थ्यांना आव्हानात्मक स्थितीसाठी सक्षम रोव्हर्स तयार करायचे असतात. ही स्पर्धा १९ आणि २० एप्रिल रोजी अमेरिकेतील अलाबामा येथील हंट्सविले येथील नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये होणार आहे. या वर्षी HERC मध्ये सात भारतीय विद्यार्थी संघ सहभागी होत आहेत. उत्कर्ष आणि ओम या दोघांची ‘टीम कैझेल’ नावाच्या संघांमध्ये निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संघात हवे तितके विद्यार्थी घेण्याची मुभा असते.

उत्कर्ष व ओमचा प्रेरणादायी प्रवास

उत्कर्ष आणि ओम या दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी व प्रवास हा खरोखरच प्रेरणादायी आहे. प्राप्त माहितीनुसार, उत्कर्षचे वडील शेतकरी होते पण ब्रेन हॅमरेजमुळे गेल्या आठ वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत, त्यामुळे १५ वर्षांचा उत्कर्ष आपल्या ८० वर्षांच्या आजोबांसह शेतात काम करून पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. तर ओमची आई नोएडामधील एका कारखान्यात काम करते, तर त्याचे वडील गेल्या वर्षीपर्यंत ई-रिक्षाचालक म्हणून काम करत होते, मागील वर्षी फ्रॅक्चरमुळे त्यांचे काम थांबले.

१९ जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा येथील जीएल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथे १४ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी झालेल्या विज्ञान प्रदर्शनात या दोघांची ‘टीम काईझेल’साठी निवड झाली होती, या टप्प्यात सुद्धा ५० हून अधिक शाळांनी सहभाग घेतला होता.

सध्या १० वी इयत्तेत शिकत असणाऱ्या उत्कर्षने सांगितले की, “मला प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी याबाबत समजले. माझ्या शिक्षकांनी मला सांगितले की निवडलेल्या विज्ञान मॉडेलला नासाला जाणाऱ्या ‘कायझेल’ टीममध्ये सामील होण्याची संधी मिळाली आहे. माझ्याकडे तयारीसाठी फक्त दोन दिवस होते, माझी जुळी बहीण निकिता हिच्या मदतीने मी फक्त दोन दिवसांत इलेक्ट्रिक वाहन चार्जरचे मॉडेल बनवले. जेव्हा मी प्रदर्शनाच्या ठिकाणी गेलो तेव्हा इतरांचे अत्याधुनिक मॉडेल्स पाहून मला वाटलं माझं १५० रुपयांमध्ये बनलेलं मॉडेल कुठेच टिकू शकणार नाही पण मला आता लक्षात येतेय की कौशल्य व नावीन्य याची किंमत पैशात होऊच शकत नाही. ओमने या टप्प्यात मार्स रोव्हरने मॉडेल तयार केले होते.

‘टीम काईझेल’ काय आहे?

टीम काईझेल स्थापना यंग माइंड रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या एनजीओने केली आहे, ज्याचे संस्थापक गोपाल जी हे फरीदाबादचे शास्त्रज्ञ आहेत. ते म्हणाले की टीम काझेलने गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत सात विद्यार्थ्यांची निवड केली होती आणि उर्वरित जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये निवडले गेले होते.

हे ही वाचा<< यशस्वी ‘सीईओ’च्या पालकांनी सांगितली पंचसूत्री; तुम्ही स्वतःला कसं बदलावं?

इतर सहा भारतीय संघांमध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स-पिलानी, गोवा कॅम्पस, कँडर इंटरनॅशनल स्कूल, बेंगळुरू, कनाकिया इंटरनॅशनल स्कूल, मुंबई, केआयईटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, दिल्ली-एनसीआर, पंजाब इंजिनीअरिंग कॉलेज, चंदीगड आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई यांचा समावेश आहे.