Viral Video : बाप आणि लेकीचं नातं जगातील सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक आहे. जन्मलेल्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतल्यावर प्रत्येक बाबाच्या डोळ्यांत नकळत पाणी येतं आणि तिथूनच बाबा आणि मुलीच्या अनोख्या प्रवासाची सुरुवात होते. मुलीचं दप्तर आपल्या पाठीवर घेऊन शाळेत सोडायला जाणं. ऑफिसमधून येताना खेळणी आणि आवडीचा खाऊ मुलीसाठी आठवणीनं घेऊन येणं. आयुष्यभर सांभाळलेल्या मुलीला कन्यादान करून सासरी पाठवणं हे सर्व फक्त एक मोठ्या मनाचा बापच आपल्या मुलीसाठी करू शकतो. अनेकदा प्रत्येक मुलाची इच्छा असते की, लग्नानंतर त्यांना मुलगीच व्हावी; तर प्रत्येक मुलीची इच्छा असते की, लग्नानंतर तिचा जोडीदार हा तिच्या वडिलांसारखाच असावा. म्हणूनच बाबा आणि मुलीची जोडी ही अनोखी मानली जाते. तर आज सोशल मीडियावरसुद्धा या अनोख्या जोडीनं धुमाकूळ घातला आहे. बाबा आणि चिमुकलीच्या जोडीचा एक अनोखा डान्स बघायला मिळाला आहे; जो तुमचंही मन जिंकेल.
तर सोशल मीडियावरील हा व्हिडीओ एका कार्यक्रमाचा आहे. जिथे बाबा आणि चिमुकलीनं एक सुंदर डान्स सादर केला आहे. ९० च्या दशकातील ‘कुछ कुछ होता है’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘ये लडका है दीवाना’ हे गाणं या व्हिडीओत सुरू आहे आणि त्या गाण्यावर बाबा आणि चिमुकली डान्स करताना दिसतायत. फुलांनी सजलेल्या हॉलमध्ये बाबा अगदी मधोमध बसले आहेत आणि मुलीसोबत डान्सचा पुरेपूर आनंद लुटत आहेत. चिमुकली आणि तिचे वडील गाण्याच्या शब्दांवर अगदी हुबेहूब हावभाव आणि जबरदस्त स्टेप्स करताना दिसून येत आहेत. तर खास गोष्ट अशी की, व्हिडीओच्या अगदी शेवटी सिग्नेचर स्टेप करून चिमुकली बाबांना अलगद मिठी मारते. डान्सदरम्यान कार्यक्रमात जमलेले प्रेक्षक बाबा आणि चिमुकलीचा उत्साह वाढवताना दिसून येत आहेत हे व्हिडीओत तुम्हाला ऐकू येईल. तसेच सोशल मीडियावर ही बाबा-लेकीची जोडी अनेकांच्या पसंतीस उतरते आहे. बाबा आणि चिमुकलीचा हा जबरदस्त डान्स तुम्हीसुद्धा एकदा बघाच …
हेही वाचा… VIDEO : कुत्र्याला चक्क पाणीपुरी खायला घालत होती महिला; नेटकरी संतापले, पाहा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ नक्की बघा :
इन्स्टाग्रामवरील हा व्हिडीओ @gavya_om या चिमुकलीच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक होत आहेत; तर काही जण या डान्सचा पुरेपूर आनंद घेत आहेत. तसेच अनेक जण हा व्हिडीओ पाहून ‘मीसुद्धा भविष्यात माझ्या मुलीसोबत असा डान्स करीन’, अशी इच्छा कमेंटमधून व्यक्त करताना दिसून येत आहेत. बाबा आणि चिमुकलीचा सुंदर व्हिडीओ तुमचेही मन जिंकेल आणि क्षणात तुम्हाला भावूक करेल यात शंकाच नाही.
