Most Beautiful Villages in India: देशातील आघाडीचे उद्योजक आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले आनंद महिंद्रा यांची एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. नेहमीच प्रेरणादायी, हृदयस्पर्शी वा मनोरंजक गोष्टी शेअर करणारे महिंद्रा यावेळी एका अद्वितीय आणि निसर्गरम्य गावाच्या सौंदर्याने इतके भारावून गेलेत की, त्यांनी त्या गावाला भेट देण्याची इच्छादेखील उघडपणे व्यक्त केली आहे. काय विशेष आहे या गावात? जाणून घ्या पुढे…
भारतातील गुप्त स्वर्ग ठिकाणं नेहमीच भटकंतीप्रेमींना आकर्षित करत आली आहेत. पण, जेव्हा महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा स्वतः एखाद्या गावाची स्तुती करतात, तेव्हा त्या ठिकाणाची जादू काही वेगळीच असते.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये आनंद महिंद्रा यांनी केरळमधील कोच्चीजवळ असलेल्या ‘कदमक्कुडी’ या तरंगत्या गावाचं अप्रतिम सौंदर्य शेअर केलं आहे. त्यांनी एक्सवर लिहिलं की, “कदमक्कुडी हे पृथ्वीवरील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे. डिसेंबरमध्ये कोच्चीच्या बिझनेस ट्रिपदरम्यान मी या ठिकाण नक्की भेट देणार आहे!”
पाण्यात तरंगणाऱ्या १४ बेटांचं हे गाव!
कदमक्कुडी हे नाव अनोखं असलं तरी हे गाव त्याहूनही अद्भुत आहे. हे १४ शांत बेटांचा समूह असून, कोच्चीपासून केवळ १५ किमी अंतरावर वसलेलं आहे. इथे पाण्याच्या मध्यभागी वसलेली घरे, बॅकवॉटर, धान्याची हिरवळ आणि पारंपरिक केरळी जीवनशैली पाहून कोणीही मंत्रमुग्ध होईल.
इथली खासियत म्हणजे पोक्कली भात शेती, जी खाऱ्या पाण्यातही उगम पावते. या भाताला २००८ मध्ये GI टॅग मिळाला असून, ही शेती इथल्या जैवविविधतेचं अनोखं उदाहरण आहे. याशिवाय इथे झिंग्याचे पोळ, ताडी निर्मिती, नारळाच्या रस्सीचं उत्पादन यांसारख्या पारंपरिक व्यवसायांचीही चांगली झलक पाहायला मिळते.
महिंद्रांच्या पोस्टने लोकांमध्ये वाढली उत्सुकता
महिंद्रांच्या या पोस्टनंतर नेटिझन्सनी त्या गावाच्या आठवणी, अनुभव आणि टिप्स शेअर करत कमेंट सेक्शन गजबजून गेलं. कोणी लिहिलं, “हा खरंच केरळचा लपलेला खजिनाच आहे!” तर कोणी म्हणालं, “सर्वात सुंदर सकाळी आणि धूकट संध्याकाळी हे गाव स्वर्गासारखं दिसतं!”
येथे पाहा व्हिडीओ
भारताच्या सौंदर्याची जागतिक ओळख!
ही पोस्ट केवळ एक ठिकाण दाखवत नाही, तर भारतातल्या अजूनही अनोळखी पण सुंदर गावांचं प्रतिनिधित्व करते. आनंद महिंद्रांच्या मते, “अशा ठिकाणांची ओळख जगासमोर आणणं गरजेचं आहे!”