China Flood Jewellery Shop Video : महापूर, त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे केवळ पर्यावरणाचेच नुकसान होत नाही, तर अनेक व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका सहन करावा लागतो. या घटनांमध्ये अनेकांचे घर-दार, दुकानं अक्षरश: उद्ध्वस्त होतात, ज्यातून सावरणं फार कठीणं असतं. या घटनांनंतर आता पुढचं जीवनं जगायचं कसं असा मोठा प्रश्न निर्माण होतो. विशेषत: लहान व्यावसायिकांना मोठ्या अडचणी निर्माण होतात. अशीच एक घटना चीनमधील एका व्यावसायिकाबरोबर घडली आहे, जिथे अचानक आलेल्या पुरात एका स्थानिक सोन्याच्या दुकानातील कोट्यावधींचे दागिने, हिरे आणि मौल्यवान वस्तू वाहून गेल्या. ही घटना लोकांना कळताच आता पुराच्या चिखलात या मौल्यवान वस्तू गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. याच घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

२५ जुलै रोजी सकाळी चीनमधील शांक्सी प्रांतातील वुची काउंटीमध्ये मुसळधार पावसाने अचानक पूर आला, यात ‘लाओफेंग्झियांग’ नावाच्या एका दागिन्यांच्या बंद दुकानात पुराचे प्रचंड पाणी शिरले. कर्मचाऱ्यांना काही समजण्यापूर्वीच पुराच्या पाण्यात दुकानातील दागिन्यांनी भरलेले ट्रे आणि कॅबिनेट वाहून गेले. यात जवळपास २० किलो सोने, चांदी आणि हिरे वाहून गेले. काही मिनिटांत दुकानातील सर्व वस्तूंचे मोठे नुकसान झाले.

दुर्दैवाने, पुरात वीज गेली आणि दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले, त्यामुळे फुटेज सापडले नाही आणि दागिने कसे वाहून गेले किंवा ते कोणी घेतले हे देखील कळू शकले नाही. दुकानाचे मालक ये यांचा मुलगा शियाओये यांने सांगितले की, दुकानातील कर्मचारी आणि आमचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहोत. आतापर्यंत फक्त एक किलो दागिने सापडले आहेत, त्यापैकी काही जणांनी स्वतः सापडलेले दागिने परत आणून दिले आहेत.

ही बातमी परिसरात वेगाने पसरताच स्थानिकांनी दागिने शोधण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही लोक चिखलात उतरून दागिन्यांचा शोध घेत आहेत, काही जणांकडे मेटल डिटेक्टरही होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाओये म्हणाला की, काही लोक दागिने उचलताना दिसले, परंतु त्यांनी अद्याप दागिने परत केले नाहीत. जे काही दागिने सापडतील ते परत करावेत अशी विनंती त्यांनी केली. त्या बदल्यात योग्य बक्षीसदेखील दिले जाईल असेही तो म्हणाला.