Bird attack funny video: आईचे प्रेम नि:स्वार्थी असते हे आपण नेहमीच ऐकतो; पण हे प्रेम केवळ मानवापुरते मर्यादित नाही. पक्षी, प्राणी, प्रत्येक सजीव प्राणी आपल्या मुलांवर असलेले प्रेम पाहू शकतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत हीच गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या व्हिडीओत एका तरुणीने पक्ष्याच्या एका लहान चिमुकल्या पिल्लाला मदत करण्याचा प्रयत्न केला; पण पुढे जे घडले, ते पाहून सर्व जण थक्क झाले.
हा व्हिडीओ एका रस्त्याच्या कडेला शूट करण्यात आला आहे, जिथे एक तरुणी एका लहान पिल्लाला उडण्यासाठी मदत करताना दिसते. तो चिमुकला पक्षी जमिनीवर बसलेला असतो आणि उडण्याचा प्रयत्न करीत असतो. तरुणी त्याला हलक्या हाताने उचलते आणि हळुवारपणे त्याला उडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करते. तिच्या चेहऱ्यावर त्या पिल्लासाठी खूप प्रेम आणि काळजी दिसते.
सुरुवातीला सगळं शांत आणि गोड वाटतं; पण काही सेकंदांतच परिस्थिती पूर्णपणे बदलते. अचानक एक मोठा पक्षी (बहुधा त्या पिल्लाची आई) झपाट्याने तिच्या दिशेने येतो आणि तिच्यावर झडप घालतो. हा प्रसंग इतका अचानक घडतो की, ती तरुणी घाबरून मागे हटते. तिच्या हातातून पिल्लू सुटून लगेच आईकडे धावते आणि दोघे एकत्र दूर उडून जातात. तिथे उपस्थित असलेले लोकही हा प्रसंग पाहून थक्क होतात.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर झाल्यानंतर काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेकांनी त्यावर हृदयस्पर्शी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “आई म्हणजे आईच — ती माणसाची असो की पक्ष्याची.” तर दुसऱ्या एका युजरने मजेत लिहिले, “अशा सुरक्षा गार्डची गरज सगळ्यांनाच आहे.” काहींनी तर या व्हिडीओतून एक शिकवणही घेतली, “आपली नियत चांगली असली तरी प्रत्येक प्राण्याची भावना वेगळी असते म्हणून त्यांच्याजवळ जाताना काळजी घेणं गरजेचं आहे.”
हा व्हिडीओ फक्त मजेशीर नाही, तर तो आपल्याला निसर्गातील प्रेम, काळजी व संरक्षण यांचा सुंदर अर्थ समजावून देतो. प्रत्येक आई मग ती मानव असो किंवा पक्षी आपल्या लेकराच्या सुरक्षेसाठी काहीही करायला तयार असते. असे व्हिडीओ आपल्याला दाखवून देतात की, निसर्गातील प्रत्येक जीवाचे जगणे आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत अनोखी असते. कारण- तेच त्याचे खरे सौंदर्य आहे.
