Foreign Woman Harassed By Men For Selfies Video : भारतात सुंदर आणि अद्भुत पर्यटनस्थळे असल्याने येथे दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यात गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी मुंबईत येतात. पण, या विदेशी पर्यटकांसह अनेकदा गैरवर्तनाचे प्रकार घडतात. सध्या गेटवे ऑफ इंडियाजवळील असाच एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात काही भारतीय पुरुष सेल्फीसाठी एका विदेशी पर्यटक महिलेसह गैरवर्तन करताना दिसतायत. यावेळी एकाने तर सेल्फीसाठी हद्दच पार केली. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून भारतीय संस्कृती, संस्कारांवर प्रश्न उपस्थित केला आहे.

अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आहे. येथे पाहुण्यांना देवासमान वागणूक दिली जाते. पण, या व्हिडीओत काही भारतीय पुरुष विदेशी महिलेला पाहून आपली मर्यादा विसरल्याचे दिसते.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पांढऱ्या रंगाचं क्रॉप टॉप घातलेली एक विदेशी महिला गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी आली होती. यावेळी ती तेथील परिसर पाहत असताना एक आंबटशौकीन अचानक तिच्या मागून येतो आणि तिच्या परवानगीशिवाय तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तो आरामात सेल्फी काढत असतो. त्याचे ते धाडस पाहून तेथे जवळच असलेले इतर पुरुषही चेकाळतात आणि सेल्फीसाठी तिच्या अवतीभवती जमा होतात. पुरुषांचा मोठा घोळका तिच्या बाजूने जमा होतो आणि सर्व एकेक करून तिच्या अगदी जवळ जात तिच्यासह सेल्फी घेऊ लागतात. ती या घोळक्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते; पण सेल्फी घेतल्याशिवाय कोणी तिला जाऊच देत नाहीत.

त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते. जेव्हा ते आंबटशौकीन पुरुष तिचे ऐकत नसल्याचे तिला दिसते तेव्हा ती मुद्दाम टोमण्याने बोलते की, आता एका फोटोसाठी १०० रुपये द्यावे लागतील. अनेकांनी म्हटले की, विदेशी महिलेबरोबरचे हे वर्तन अत्यंत चुकीचे आहे. सेल्फी काढण्याची परवानगी घेतल्याशिवाय एखाद्या सेलिब्रिटीबरोबरही फोटो काढू शकत नाही; मग ती तर विदेशी महिला होती. त्यामुळे अनेक जण हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

हा संतापजनक व्हिडीओ @SaralVyangya नावाच्या एका एक्स युजरने पोस्ट केला आहे, ज्यावर आता इतर युजरही कमेंट्स करीत चीड व्यक्त करतायत. एका युजरने लिहिले की, तुमच्या अशा वागण्यातून देशाची प्रतिमा डागाळू देऊ नका. कृपया विदेशी पर्यटकांसह गैरवर्तन करू नका. असे केल्याने आपल्या देशाची प्रतिमा डागाळली जाईल. तर दुसऱ्याने लिहिले की, आपल्याच देशात विदेशी व्यक्तीसह फोटो काढण्याच्या नादात विकले गेलेत. तर तिसऱ्याने संतापून लिहिले- हे लज्जास्पद आहे, या लोकांमुळे भारताची प्रतिमा आधीच डागाळली आहे. हे लोक का सुधारत नाहीत. तर काहींनी, असल्या पुरुषांमुळे अनेकदा भारताचं नाव खराब होतंय, असे म्हटले आहे.