Ganpati Bappa viral photo: मुंबईमधील प्रत्येक सण हा लोकांच्या हृदयाशी जोडलेला असतो. त्यातील गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह, भक्तीचा मेळावा असतो. मुंबईकरांसाठी गणपती बाप्पा हा फक्त देव नसून, कुटुंबाचा तो एक सदस्य आहे.
गणेश चतुर्थीचा सण आला की, गल्लीबोळ, सोसायटी, सार्वजनिक मंडळ सगळीकडे दिव्यांची रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि गणपतीचं आगमन झालं की, बाप्पाच्या स्वागताचा जल्लोष सुरू होतो. त्याचबरोबर गणपतीचे अनेक व्हिडीओ, फोटो या काळात व्हायरल होत असतात. या वर्षीही गणेशोत्सवात एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं आहे. हा अनोखा प्रयोग पाहून लोक अक्षरशः थक्क झाले असून, त्या प्रयोगाचा फोटो व्हायरल होतोय.
स्वप्ननगरी मुंबई सध्या गणेशोत्सवाच्या जल्लोषात रमली आहे आणि त्याचप्रमाणे सोशल मीडियावर एक खास फोटो व्हायरल होत आहे. घाटकोपरमधील एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीला विद्युत दिव्यांच्या रोषणाईच्या माध्यमातून श्री गणेशाच्या चेहऱ्याचा आकार देण्यात आला आहे. या अनोख्या प्रकाशाद्वारे साकारलेली ही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मुंबईकर नेहमीच बाप्पाच्या स्वागतासाठी नवनवीन आणि सर्जनशील पद्धतींचा वापर करीत असतात, त्याचेच हे एक सुंदर उदाहरण आहे. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘तेजस माने’ या युजरने हे सुंदर फोटो शेअर केले असून, ते खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. एका युजरने याआधी बांधकाम चालू असलेल्या इमारतीचे विजेच्या दिव्यांच्या माध्यमातून स्वस्तिकाच्या आकारातील फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘तेजस माने’ यांनी बाप्पाच्या चेहऱ्याच्या आकारात उजळलेली घाटकोपरमधील ही इमारत दाखविणारे फोटो शेअर केले आणि लिहिले, हे घाटकोपरमध्ये पाहिलेलं दृश्य.
ही विद्युत रोषणाई फक्त एक सजावट नसून, ती श्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा सुंदर संगम आहे. इमारतीच्या चौकटीत अचूक जागी विद्युत दिवे लावून, बाप्पाचे रूप दिसेल, अशी प्रकाशयोजना करण्यात आली आहे. या कामासाठी बारकाईने डिझाइन, नियोजन व कौशल्य यांचा वापर केला गेला आहे. त्यामुळे या संपूर्ण इमारतीच्या माध्यमातूनच जणू बाप्पा भक्तांना आशीर्वाद देत आहे, असा आपसूकच भाव भाविकांच्या मनात निर्माण झाल्याशिाा राहत नाही.