Gas Cylinder Blast Video: एकदम शांत घर… नेहमीप्रमाणे दिवस सुरू होता… पण कुणालाही कल्पना नव्हती की, काही क्षणांत एक प्रचंड स्फोट होणार आहे, जो त्यांचं सगळं जगच बदलून टाकेल. एका घरात गॅस सिलिंडरचा असा काही स्फोट झाला की, अख्खं घरच पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर एक महिला अजूनही मृत्यूसोबत झुंज देतेय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, तो व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येतो. एका क्षणात घर उद्ध्वस्त झालं, रस्त्यावरून जात असलेल्या निष्पाप नागरिकांवर घराचा ढिगारा कोसळला… हे सगळं इतकं अचानक घडलं आणि ते इतकं भीषण होतं की, आजूबाजूचे लोक गोंधळूनच गेले. या घटनेचा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकू शकतो…

तेलंगणातील हैदराबादच्या मेडचल परिसरात भीषण स्फोटाची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एका घरात ठेवलेला गॅस सिलिंडर अचानक एवढ्या जोरात फुटला की, काही सेकंदांत संपूर्ण घर जमीनदोस्त झालं. स्फोटामुळे फक्त घरच कोसळलं नाही, तर त्याचा ढिगारा रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांवरही पडला. या दुर्घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ही हृदयद्रावक घटना मेडचल भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घडली. माजी एमपीटीसी सदस्य मुरली यांच्या घरात ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे केवळ काही सेकंदांत संपूर्ण घर कोसळलं. त्यात घरात दोन व्यक्ती अडकल्या होत्या. स्थानिकांनी व बचाव दलाने तत्काळ मदतीस धाव घेत, त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. मात्र, त्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरी एक महिला अद्याप गंभीर अवस्थेत आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही; परंतु प्राथमिक माहितीनुसार तो घरातील सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे. तर, जखमी महिला अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या भयंकर दुर्घटनेनंतर पोलीस व अग्निशमन दल यांची पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासात स्पष्ट झालं की, ही ही दुर्घटना गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळेच घडली. मात्र, नेमका स्फोट कशामुळे झाला ते अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या स्फोटामागे गॅसगळती की शॉर्टसर्किट यापैकी नेमकं काय कारण आहे याचा तपास सध्या सुरू आहे.

येथे पाहा व्हिडीओ

या स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की, आजूबाजूचे नागरिकदेखील हादरले. अनेकांनी धावत जाऊन दुर्घटनेत सापडलेल्यांना मदत केली आणि लगेचच आपत्कालीन यंत्रणांना कळवलं.