Why Gautam Gambhir Trolled Rajat Sharma: भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) व स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यातील भांडण सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. पण याच भांडणात आता अचानक पत्रकार रजत शर्मा हे ट्विटरवर प्रचंड ट्रोल होत आहेत. डीडीसीएचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील वादात लाईव्ह टीव्हीवर केलेल्या कमेंटवरून हे ट्रोलिंग होत असल्याचे समजतेय. पण ही कमेंट काय होती आणि त्यावर नेटकऱ्यांचे काय म्हणणे आहे हे पाहूया…
रजत शर्मा यांचा व्हायरल Video (Rajat Sharma Viral Video)
रजत शर्मा यांनी इंडिया टीव्हीवरील आपल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गंभीरचा अहंकार वाढल्याचे विधान केले आहे. शर्मा म्हणाले की, “विराट कोहली असा खेळाडू आहे जो नेहमीच आक्रमक होता आणि कोणताही मूर्खपणा सहन करत नाही आणि म्हणूनच त्याने गौतम गंभीरला चोख प्रत्युत्तर दिले. पण एकंदरीत, गंभीरचे वागणे खेळाविरुद्ध होते आणि ते माजी खेळाडू किंवा संसद सदस्याला शोभत नाही. अशा घटनांमुळे क्रिकेटचे स्पिरिट बिघडते आणि त्यामुळे असं व्हायला नको होतं.”
गौतम गंभीरचे ट्वीट (Gautam Gambhir Tweet)
दुसरीकडे या वादावर उत्तर देताना गंभीरने रजत शर्मा यांचा लोकप्रिय शो ‘आप की अदालत’ ला टार्गेट करून ट्वीट केले आहे. “दबावाच्या नावाखाली DDCA अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे, क्रिकेटची चिंता म्हणून पैसे घेऊन पीआर करण्यास उत्सुक दिसत आहे, हे कलियुग आहे जिथे पळकुटे ‘अपनी अदालत’ चालवत आहेत.” असे गंभीरने लिहिले होते.
दरम्यान काही चाहत्यांनी सुद्धा आता या वादात उडी घेतली आहे. काहींच्या मते गंभीर आणि कोहलीचे भांडण हा वेगळाच मुद्दा आहे पण रजत शर्मा यांची कमेंट अनावश्यक व द्वेष भावनेने केलेली वाटली. तुम्ही कोहली किंवा गंभीर कोणाचीही बाजू घ्या पण रजत शर्मा यांचे चुकलेच आहे असेही काहीजण कमेंट करत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी आरसीबीने 20 षटकांत 126/9 धावा केल्या. आरसीबीच्या विजयानंतर एलएसजीचे मार्गदर्शक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि आरसीबीचा खेळाडू विराट कोहली यांच्यात भांडण झाले होते. या भांडणांनंतर गौतम गंभीर व विराट दोघांना एका मॅचची १०० टक्के फी इतका दंड आकारला होता एलएसजीचा गोलंदाज नवीन-उल-हक यालाही आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.