Gautami Patil Real Name: आधी टीका मग प्रेम आणि आता चाहत्यांचा मोठा पाठिंबा असलेली गौतमी पाटील सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे खरंतर गौतमीचं नाव चर्चेत आलं. पांढऱ्या- निळ्या नऊवारी साडीत केलेला अश्लील इशारा लावणी म्हणून व्हायरल झाल्याने अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र उगारलं होतं. त्यानंतर गौतमीने माफी मागून आपण आपली चुका सुधारू असं सांगितलं आणि तिचे कार्यक्रम चालूच ठेवले. वेळेनुसार गौतमीच्या नृत्याला पुरुषांसह महिलांची सुद्धा उपस्थिती वाढू लागली. टीकेमुळे चर्चेत आलेली गौतमी मग प्रेक्षकांसह तिच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेकांना आवडूही लागली. तितक्यात गौतमीच्या आडनावावरून नवा वाद सुरु झाला होता. एकीकडे हे प्रकरण तापलं असताना तिच्या लहानपणीच सोडून गेलेल्या वडिलांची एंट्री झाली आणि मग गौतमी व तिच्या आईच्या नावाची वेगळी चर्चा सुरु झाली होती. काहीच दिवसात आजारपणामुळे गौतमीच्या वडिलांचे निधन झाले आणि या चर्चा कमी झाल्या. चित्रपटासारखं खरं आयुष्य जगताना गौतमीचा घुंगरू नावाचा चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला, आणि बॉक्स ऑफिसपर्यंत पोहोचायच्या आधीच पडला. या सगळ्यात आता गौतमीच्या खऱ्या नावावरून एक वेगळी चर्चा सुरु झाली आहे. नेमकं हे प्रकरण काय पाहूया..

गौतमी पाटीलचं खरं नाव काय?

सबसे कातील, गौतमी पाटील अशा घोषणांनी प्रसिद्ध असणाऱ्या गौतमीने अलीकडेच एका कार्यक्रमात चाहतीशी गप्पा मारताना आपलं नाव वेगळंच सांगितलं आहे. जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकमात गौतमी हिला देखील बोलावण्यात आलं होतं. तेव्हा गौतमी हिने तिच्या एका चाहतीची भेट घेतली. गौतमीने या चिमुकल्या चाहतीला तिचं नाव विचारलं. तेव्हा तिने नाव वैष्णवी आहे असं सांगितलं. यावर गौतमी म्हणाली, ‘माझं देखील जन्मनाव वैष्णवी असं आहे…’. हा खुलासा गौतमीने गप्पांच्या वेळी केला आहे त्याचा काही पुरावा दाखवलेला नाही पण आता या वैष्णवी नावावरून गौतमी पुन्हा चर्चेत आली असं म्हणायला हरकत नाही.

गौतमीच्या ‘पाटील’ आडनावाचा वाद

दरम्यान, वर म्हटल्याप्रमाणे अशाप्रकारे गौतमीच्या नावावरून वाद होण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गौतमी पाटील हिच्या आडनावावरुन सुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता. गौतमी हिने पाटील हे आडनाव लावू नये असा इशारा देखील तिला देण्यात आला होता. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. तिने पाटीव नाव लावल्यास तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला होता. यावर गौतमीच्या वडिलांनी सुद्धा त्यावेळी गौतमी ही पाटीलच आहे आणि पाटीलच नाव लावणार अशी भूमिका मांडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा<< गौतमी पाटीलचे वडील कोण आहेत? मूळ नाव व काम काय? म्हणाले, “आज गौतमीचा आदर वाटतो पण..”

अलीकडेच गौतमी पाटील हिने ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिराला भेट दिली होती. यावेळी मंदिर प्रमुखांनी फुले आणि प्रसाद देऊन गौतमीचे स्वागत केले होते.