Ghatkopar Versova Metro Viral Video : लोकल ट्रेनच्या गर्दीला कंटाळून अनेक मुंबईकर मेट्रो प्रवासाला प्राधान्य देताना दिसतात. कमी वेळेत आणि पैशात ठराविक स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना मेट्रोचा पर्याय बेस्ट वाटतो. पण, गेल्या काही दिवसांपासून मेट्रोची अवस्था लोकल ट्रेनपेक्षा कठीण होत असल्याचे दिसतेय. सध्या सोशल मीडियावर घाटकोपर ते वर्सोवादरम्यान धावणाऱ्या एका मेट्रो ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात संतापलेले प्रवासी मेट्रो थांबवून गोंधळ घातलाना दिसतायत. पण, असं नेमकं काय घडलं जाणून घेऊ….

अनेक मुंबईकर रोज सुखमय आणि गारेगार प्रवासासाठी मेट्रोने प्रवास करतात. पण, मेट्रोतील एसी बंद पडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या व्हिडीओतही अशीच घटना घडली. सकाळच्या वेळी घाटकोपर ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या अनेक मेट्रो ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. लोक अक्षरश: मेट्रोतून कोंबून प्रवास करतात. याचदरम्यान अचानक एसी बंद झाल्याने प्रवासी गुदमरले, गर्दीत अनेकांना श्वास घेण्यास अडचण होऊ लागली, याचदरम्यान एका स्थानकावर मेट्रो थांबताच संतापलेल्या प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी काही प्रवाशांनी दरवाजा अडवून एसी सुरू करत नाही तोपर्यंत ट्रेन सो़डणार नाही असा निर्धार केला. या गोंधळानंतर मेट्रो स्थानकावरील सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांची समजूत काढत ट्रेन मार्गी लावली.

व्हिडीओत पाहू शकता की, घाटकोपर ते अंधेरीदरम्यान धावणारी मेट्रो एका स्थानकावर थांबताच प्रवासी जोरजोरात गोंधळ घालताना दिसतायत. मेट्रोतील एसी बंद असल्याने प्रवासी चांगलेच संतापलेत, त्यांनी मेट्रोचा दरवाजा अडवून एसी सुरू होत नाही तोपर्यंत मेट्रो सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी मेट्रो स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, संतप्त प्रवाशांनी इतकी प्रचंड गर्दी त्यात एसी बंद असल्याने आम्ही गुदमरुन आता मरू असा सवाल केला. पण, सुरक्षा कर्मचारी काहीच उत्तर न देता जबरदस्ती प्रवाशांना आत ढकलून दरवाजा बंद करतात.

या घटनेमुळे मेट्रो स्थानकावर काहीवेळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, पण ही परिस्थिती आजची नाही रोजची आहे. अनेकदा ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोतील एसी बंद पडत असल्याने प्रवाशांना महागडं तिकीट काढूनही गुदमरून प्रवास करतावा लागतो, त्यामुळे या व्हिडीओवरही अनेक प्रवासी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आपल्या तक्रारी सांगताना दिसतायत.