सोशल मीडियावर ‘चॅलेंज गेम’चा सध्या ट्रेंड आहे. मध्यंतरी ‘आइस बकेट चॅलेंज’ आले होते. बर्फाने भरलेली बादली डोक्यावर ओतायची आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचा आणि हे चॅलेंज पूर्ण झाल्यावर दुस-याला ते पूर्ण करण्याचे आवाहन करायचे. अशा वेगवेगळ्या चॅलेंजची सोशल मीडियावर चलती आहे आणि अनेक तरुण मंडळी अशी आवाहन स्वीकारून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असतात. असाच ‘१०० लेअर ऑफ क्लोथ’ हा चॅलेंज स्वीकारणे एका अल्पवयीन मुलीला महागात पडले आहे.
अंगावर १०० कपडे चढवून फ्लोरिडामधल्या अँड्रीया या अल्पवयीन मुलीने ‘१०० लेअर ऑफ क्लोथ’  हे चॅलेंज स्वीकारले. यशस्वीपणे  तिने ते पारही केले पण नंतर मात्र हे चॅलेंज तिच्या इतके अंगाशी आले की सोशल मीडियावर ‘मला वाचवा नाहीतर माझा जीव जाईल’ असे रडून  सांगण्याची वेळ तिच्यावर आली. अँड्रीयाने अंगावर असंख्य कपड्याचा थर चढवला पण नंतर मात्र तिला त्यातला एकही कपडा काढता येईना. कपड्यांचा थर तिच्या अंगावर इतका चिकटला होता की हात वर करून तिला ते काढणे शक्य होईना. घरात कोणीही नसल्याने अखेर ट्विटरवर तिला फॉलो करणा-या मित्र मैत्रिणींना रडत आपल्याला या संकटातून बाहेर काढण्याची विनंती तिला करावी लागली. तसेच अशा प्रकारचे चॅलेंज तुम्ही स्वीकारलात तर नक्कीच जीव गमावण्याची वेळ तुमच्यावर येईल असेही ती रडून रडून सांगत होती. अखेर तिचा हा व्हिडिओ ट्विटरवर काही जणांनी पाहिला आणि थेट तिच्या घरी धाव घेतली.  यातून तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.