“गॅंगस्टाज पॅराडाईज” आणि “फॅन्टॅस्टिक व्हॉयेज” यासारखी हिट गाणी गेलेला, ९०च्या दशकातील सुप्रसिद्ध हिपहॉपर्सपैकी एक कुलिओ याचे वयाच्या ५९व्या वर्षी निधन झाले. त्याच्या मॅनेजरने त्याच्या निधनाची पुष्टी केली आहे. बुधवारी, २८ सप्टेंबरला लॉस एंजेलिसमधील मित्राच्या घरी कुलिओचे निधन झाले असल्याची माहिती मॅनेजर जारेझ पोसे यांनी असोसिएटेड प्रेसला दिली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कुलिओचे खरे नाव आर्टिस लिओन इवे जूनियर होते. त्याला “गॅंगस्टाज पॅराडाईज” साठी ‘सर्वोत्कृष्ट सोलो रॅप परफॉर्मन्स’साठी ‘ग्रॅमी पुरस्कार’ मिळाला. १९८० साली आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कुलिओला इतर पाच ग्रामी पुरस्कारांसाठी नामांकनही मिळाले होते.

कुलिओचा जन्म पिट्सबर्गच्या दक्षिणेस पेनसिल्व्हेनियामधील मोनेसेन येथे झाला. यानंतर तो कॉम्प्टन, कॅलिफोर्निया येथे स्थलांतरित झाला. हिप-हॉपमध्ये करिअर सुरु करण्याआधी त्याने स्वयंसेवक अग्निशामक म्हणून आणि विमानतळाच्या सुरक्षेत काम केले. १९९४ साली रिलीज झालेल्या टॉमी बॉय रेकॉर्ड्सवरील “इट टेक्स अ थीफ” या अल्बमने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. याच्याच एक वर्षानंतर त्याचे “गँगस्टाज पॅराडाईज” हे गाणे त्यातील गंभीर शब्दांमुळे सर्वोत्कृष्ठ ठरले.

आत्मनिर्भर पुणेकर तरुणी श्रीमंतांच्या यादीत! एकूण संपत्ती आहे १३ हजार ३८० कोटी

कुलिओच्या अचानक निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कुलिओला श्रद्धांजली वाहिली आहे. एका युजरने म्हटलंय, “ही दुःखद बातमी आहे.” तर दुसऱ्या युजनने म्हटलंय, “अतिशय सुंदर आणि शांत प्रवास भावा.”