Emotional Indian Grandma Video: एका साध्याशा थाळीपुढे बसलेली वृद्ध महिला… चेहऱ्यावर खोल सुरकुत्या, डोळ्यांत श्रद्धा आणि हात जोडलेले… जेवण सुरू करण्याआधी ती जे करते, ते पाहून लाखो लोक थक्क झालेत. सोशल मीडियावर धूम माजवणाऱ्या या व्हिडीओत ना कुठला नाटकीपणा, पण जे आहे ते काळजाला भिडणारं आहे. आपल्या संस्कृतीचा, आपल्या हरवत चाललेल्या ‘संस्कारांचा’ अस्सल स्पर्श.

या व्हिडीओमध्ये जे घडतं, ते आजच्या पिढीसाठी धक्का देणारं ठरू शकतं. कारण- आज आपण भुकेच्या ओढीने ताटावर तुटून पडतो, मोबाईल स्क्रोल करीत करीत जेवतो आणि ‘अन्न’ म्हणजे केवळ पोट भरण्याचं माध्यम मानतो; पण ती आजीबाई… ती मात्र अन्नात देव पाहते, आभार मानते, नमन करते… अगदी परमेश्वरासारखं वागवते.

तिची प्रत्येक हालचाल, थोडं पाणी घेऊन अन्न देवतेला समर्पण करणं, पुन्हा पुन्हा हात जोडून डोळे मिटणं हे सगळं पाहून कोणताही संवेदनशील माणूस अंतर्मुख होईल. या साध्याशा; पण खोल भावनेने भरलेल्या क्षणाने इंटरनेटवर भावनांचा पूर आणलाय.

आजच्या धावपळीच्या युगात, जिथे लोक फारसा विचार न करता जेवतात, परंपरांना विसरत चालले आहेत, अशा वेळी एक आजीबाईंचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा केवळ व्हिडीओ नाही, तर आपल्या संस्कृतीची, आपल्या मूल्यांची एक सुंदर झलक आहे आणि म्हणूनच तो लोकांच्या मनाला भिडत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक साध्या वेशातली वृद्ध आजी एका पारंपरिक घरात जेवणासाठी बसलेली आहे. तिची सून प्रेमाने तिला थाळी समोर ठेवते आणि त्यांच्या केसांना हात फिरवते. पण आजी जेवायला सुरुवात करीत नाहीत त्या प्रथम अन्न देवतेला नमस्कार करतात. थाळीतल्या अन्नासमोर त्या हात जोडून नम्रता आणि श्रद्धेने नमन करतात. नंतर आपल्या लोट्यातून थोडेसे पाणी तळहातावर घेऊन अन्न देवतेस अर्पण करतात. पुन्हा हात जोडून डोळे मिटून, त्या एकाग्रतेने नमन करतात. त्यांच्या डोळ्यांतली श्रद्धा, चेहऱ्यावरचे समाधान आणि सुरकुतलेलं पण तेजस्वी व्यक्तिमत्त्व पाहून कोणीही भारावून जाईल.

“अन्न हे केवळ अन्न नाही, तो एक आशीर्वाद आहे!”, या व्हिडीओला पाहून असंख्य नेटकरी भावूक झाले आहेत. एका युजरने लिहिले, “ही आहे खरी आपली संस्कृती – जेवणाला आधी देवाचं स्थान देणारी!” दुसऱ्याने म्हटले, “आजची तरुण पिढी यामधून शिकू शकते की, पूर्वीच्या पिढ्या अन्न आणि निसर्गाविषयी किती आदर बाळगत होत्या.”

@SanidhyaShwet नावाच्या युजरने हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर शेअर केला असून, बातमी लिहेपर्यंत तब्बल १.५ लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे, आणि सहा हजारपेक्षा जास्त जणांनी तो लाईक केला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

ही केवळ एक वृद्ध महिला नाही, ती आपल्या संस्कृतीचा शेवटचा दीपविव आहे, जो अजूनही न विझता तेजाने प्रज्वलित आहे… हा व्हिडीओ केवळ व्हायरल झाला नाही, तर त्यानं लाखो लोकांना आपल्या संस्कृतीकडे पुन्हा पाहायला भाग पाडलंय. काहींना आपल्या आजीची आठवण झाली, तर काहींना आपलं बालपण. हे दृश्य म्हणजे केवळ अन्नासमोर केलेलं नमन नाही, तर ते आहे आपल्या मुळाशी जोडून घेण्याचा एक जिवंत धागा… जो अजूनही शिल्लक आहे – त्या आजीच्या रूपानं.