आतापर्यंत आपण पती आणि पत्नीच्या वादांसंदर्भात अनेक बातम्या वाचल्या असतील. मात्र एक अगदीच विचित्र बातमी नुकतीच समोर आलीय. पत्नीकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून एका पीडित नवऱ्याने चक्क पोलीस स्थानकाला आग लावल्याची घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. मागील बऱ्याच काळापासून आपल्याला पत्नीकडून सातत्याने त्रास दिला जात होता. त्यामुळेच तिच्यापासून दूर जाण्यासाठी आणि तिच्या छळापासून सुटका मिळावी म्हणून आपण पोलीस स्थानकाला आग लावली असून आता आपल्याला बऱ्याच काळासाठी तुरुंगामध्ये राहता येईल याबद्दल या व्यक्तीने समाधान व्यक्त केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
आता तुम्हाला ही एखादी फेक न्यूज वाटू शकते मात्र गुजरातमधील राजकोट येथे खरोखरच असा प्रकार घडला असून सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी या पतीला पोलिसांनी अटक केलीय. रविवारी या व्यक्तीने राजकोट शहरातील जानगर रोडवरील बजरंग वाडी पोलीस स्थानकासमोरच्या छोट्या चौकीला आग लावली आणि तो स्वत: पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची कबुली देण्यासाठी आणि अटक करुन घेण्यासाठी हजर झाला.
न्यूज १८ गुजरातने दिलेल्या माहितीनुसार गांधीग्राम पोलीस स्थानकाचे निरिक्षक खुमान सिंह वाला यांनी घटलेला प्रकार खरा असल्याचं सांगितलं. “बजरंगवाडी पोलीस स्थानकासमोरील चौकीला आग लावणाऱ्या व्यक्तीचं नाव देवजी उर्फ देव चावडा असं आहे. आर्थिक चणचण आणि घरगुती भांडणांमुळे तो आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे,” असं वाला यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी देवला अटक केल्यानंतर त्याने असं का केलं यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता पत्नीसोबतच्या भांडणाला कंटळाून तिच्यापासून दूर राहता यावं म्हणून आपण पोलीस चौकीला आग लावल्याचं देव म्हणाला.
सरकारी संपत्तीचं नुकसान केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी देवला आयपीसी कलम ४३६ अंतर्गत अटक केलीय. पोलीस तपासामध्ये देव हा पत्नीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळला होता. त्यामुळेच त्याला पत्नीपासून जास्तीत जास्त काळ दूर रहायचं होतं. मात्र आर्थिक चणचण असल्याने त्याला कुठे जाता येत नव्हतं. म्हणूनच त्याने तुरुंगवास होईल आणि पत्नीपासून लांब राहता येईल या हेतूने पोलीस स्थानकाला आग लावल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आयपीसी कलम ४३६ अंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीला दहा वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे आता देव याला किती शिक्षा होते ते प्रकरण न्यायालयामध्ये गेल्यानंतरच स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये देवच्या पत्नीचीही चौकशी केली जाणार आहे.