Traffic Jam Viral Video: भारतामध्ये ट्रॅफिक म्हटलं की लोकांना पहिल्यांदा मुंबई आणि बंगळुरू या शहरांची आठवण येते. मात्र, या यादीत आता गुरुग्रामचं नावही मोठ्या ठळकपणे समोर आलं आहे. रोजचं ट्रॅफिक जाम, गाड्यांच्या रांगा, हॉर्नचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांचा त्रास हे दृश्य आता सोशल मीडियावरही व्हायरल होताना दिसतं. पण, याच ट्रॅफिकमध्ये एका स्कुटीवाल्याने जो कारनामा केला आहे, तो पाहून मुंबईकरांचीही दातखिळी बसली आणि लोक म्हणू लागले, “हे खरंच शक्य आहे का?” नेमकं तरुणांनी काय केलं जाणून घ्या…
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की रस्त्यावर मोठा ट्रॅफिक जाम लागलेला आहे. गाड्यांच्या लांबच लांब रांगा थांबल्या आहेत. या जाममध्ये अडकलेले दोन युवक त्यांच्या स्कुटीवर बसून वैतागले. पण, अचानक त्यांनी असा जुगाड केला की पाहणाऱ्यांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्या दोघांनी स्कुटीवर बसण्याऐवजी ती थेट आपल्या डोक्यावर उचलून चालायला सुरुवात केली!
१२ सेकंदांच्या या छोट्याशा क्लिपमध्ये तुम्ही पाहाल की दोघं जण गर्दीतल्या गाड्यांना चुकवत, डोक्यावर स्कुटी घेऊन निर्धास्त चाललेत. लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि मजा दोन्ही दिसत होती. कुणाला हसू आवरत नव्हतं, तर कुणी म्हणत होतं – “हा असा जुगाड मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये केला तर काय धमाल उडेल!”
सोशल मीडियावर या व्हिडीओने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. इन्स्टाग्रामवर @gurgaon_locals या पेजवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तब्बल १९ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये मात्र भन्नाट रिअॅक्शन्सची बरसात झाली आहे. कुणी लिहिलं – “भाऊ, कार असेल तर कशी नेता येईल?” तर दुसऱ्याने लिहिलं – “मुंबईकरांनी असं केलं तर बेस्टमध्ये बस, टॅक्सी आणि रिक्षाही डोक्यावर दिसतील!”
लोकांनी विनोदातून अनेक उपाय सुचवले. कुणी म्हटलं, “जमिनीखाली मेट्रोप्रमाणे मोठे टनेल करा, तिथून गाड्या सोडा.” तर एका युजरने तर भन्नाट कमेंट केली – “मीसुद्धा स्कुटी उचलतो, फक्त अॅम्ब्युलन्स रेडी ठेवावी लागेल.”
येथे पाहा व्हिडीओ
गुरुग्रामचा हा व्हिडीओ जरी मजेशीर असला, तरी यातून मोठा प्रश्न उभा राहतो – ट्रॅफिकच्या जंजाळातून सुटण्यासाठी लोकांना खरंच असा ‘जुगाड’करावा लागणार का?