मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न लावून देण्याच्या नावाखाली एका तरुणाची फसवणूक केली आहे. शिवाय या लग्नासाठी मुलीच्या वडिलाने तरुणाकडून तब्बल एक लाख रुपये आणि ९ म्हशीही घेतल्या होत्या. पीडित तरुणाने मुलीच्या वडिलाचा संशय आल्यानंतर त्याने लोकांकडे चौकशी केली असता त्याला धक्कादायक माहिती समजली. ती म्हणजे त्याच्याकडून पैसे घेतलेल्या व्यक्तीने मुलीच्या लग्नाच्या नावाखाली यापूर्वीही अनेकांची फसवणूक केली आहे. ही धक्कादायक माहिती समजताच पीडित तरुणाने संपुर्ण प्रकरणाची पोलिसात तक्रार केली.
आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी व्यक्तीच्या मुली अजूनही अल्पवयीन आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपींकडून म्हशी जप्त करून पीडित तरुणाच्या स्वाधीन केल्या आहेत. याप्रकरणाची माहिती देताना डीएसपी संतोष पटेल म्हणाले, “या भागातील स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये मोठी तफावत असल्याने तरुणांची लग्नं होत नाहीत, त्यामुळे लग्नाच्या प्रकरणात त्यांची फसवणूक होत आहे.”
याप्रकरणी डीएसपी काय म्हणाले?
डीएसपी संतोष पटेल यांनी सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण तिघरा भागाशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या एका मुलीच्या वडिलाने एका तरुणाची फसवणूक केली आहे. आरोपीने एका तरुणाला आपल्या मुलीचे त्याच्या भावाशी लग्न लावून देतो असं सांगितलं होतं. शिवाय लग्नाच्या नावाखाली आरोपींनी त्या व्यक्तीकडून एक लाख आठ हजार रुपयेही घेतले होते. पोलिसांनी सांगितलं, आरोपीने मे महिन्यात आपल्या मुलीचे लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तक्रारदाराने लग्नाची तारीख मागितली असता त्याने लग्नासाठी नवीन अटी घातल्या आणि लग्नाच्या बदल्यात म्हशीची मागणी केली होती. तर सध्या आरोपी वडील पोलिसांच्या ताब्यात आहे.